Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : धक्कादायक! प्रियकराचा खून करून मृतदेह घाटात टाकून जाळण्याचा प्रयत्न; खोपोलीतील महिलेचं कृत्य

अनैतिक संबंधातून (love Affair) व आर्थिक वादातून (Financial Dispute) खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ डिजिटल टीम

गजेंद्र व सुनीताची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गजेंद्रने लग्न करावे, असा सुनीताचा आग्रह होता.

उत्तूर (जि. कोल्हापूर) : सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियकराचा खोपोली (जि. रायगड) येथे खून केला आणि मृतदेह मुमेवाडी (ता. आजरा) येथील घाटात टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला आजरा पोलिसांनी शिताफीने पकडले. गजेंद्र सुभाष बांडे (वय ३८, जितूर, जि. परभणी) असे मृताचे नाव आहे.

आजरा पोलिसांनी (Ajara Police Station) गजेंद्रचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनीता सुभाष देवकाई (रा. वैभव गार्डन, विठ्ठल मंदिर शेजारी खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) हिला ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधातून (love Affair) व आर्थिक वादातून (Financial Dispute) खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गजेंद्र व सुनीताची सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गजेंद्रने लग्न करावे, असा सुनीताचा आग्रह होता. गजेंद्रने पुन्हा आश्वासन देऊन तिच्याकडून पैसे घेतले. नंतर मात्र तो टाळाटाळ करू लागला. उसने पैसे देत नाही व लग्नही करीत नाही, या रागातून तिने त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने तिचा दुसरा मित्र अमित पोटे (रा. सुळे, ता. आजरा) व मुलगा सूरज सुभाष देवकाई यांची मदत घेतली. सुनीताने बुधवारी (ता. २७) रात्री साडेअकराला गजेंद्रला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोप लागल्यावर दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला.

दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन तिने एक मोठी प्रवासी बॅग खरेदी केली. गजेंद्रचे हातपाय बांधले व त्याला प्रवासी बॅगेत कोंबले. त्याचे कपडे काढून बॅगेच्या वरील कप्यात ठेवले. मुलगा सूरजला खोपोलीत थांबवून एक भाडेतत्त्‍वावरील गाडी बोलावून घेतली. त्यामध्ये बॅग ठेवली. कागल येथे आल्यावर चालकाला लॉजवर थांबवून अमित व सुनीता मुमेवाडी घाटात गाडी घेऊन आले. निर्जनस्थळ पाहून गाडीतील बॅग काढून ती ओढत थोड्या अंतरावर झुडपाजवळ नेली.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे दीडच्या दरम्यान आजरा पोलिस या परिसरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. घाटात संशयास्पद वाहने उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी चालकाकडे विचारणा केली असता गाडीत प्रवासी महिला आहे. ती लघुशंकेसाठी गेल्याचे सांगितले. यावेळी एक महिला झुडपाआड लपलेली आढळली.

पोलिसांनी त्या ठिकाणी पाहिले असता मोठी बॅग, जवळच पेट्रोल भरलेल्या बाटल्या व चादरीत गुंडाळलेला हरभऱ्याचा कोंढा आढळला. पोलिसांनी बॅगेची झडती घेतली असता त्यात हातपाय बांधलेला मृतदेह व कपडे, कागदपत्रे आढळली. इकडे पोलिसांना पाहून अमित गाडीसह पसार झाला. गजेंद्रचा आपण खून केला असून पुरावा नष्ट करण्यासाठी येथे आणल्याचे सुनीताने कबूल केले. पोलिसांनी सुनीताला अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. ठाणे अमलदार बाजीराव कांबळे यांनी फिर्याद दाखल केली.

ठाणे अंमलदारांचा चाणाक्षपणा

घटनास्थळी मोटारचालकाने महिला लघुशंकेसाठी गेल्याचे सांगितले; मात्र ठाणे अंमलदार बाजीराव कांबळे यांना चालकाच्या बोलण्यात विसंगती वाटली. त्यांनी मोबाईलच्या प्रकाशात परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बॕग व पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आढळल्या. कांबळे यांनी दाखवलेल्या चाणाक्षपणामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस येण्यास मदत झाली.

लग्न, पैशाच्या वादातून प्रकार

सुनीता व गजेंद्रचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो २४ मार्चला परभणीहून सुनीताकडे खोपोलीत आला. सुनीताने त्याला आपल्या ओळखीने भाडेतत्त्वावरील खोली घेऊन दिली. ती त्याला तेथे भेटू लागली. तिने २७ मार्चला पुन्हा लग्नाचा व पैशाचा विषय काढला; मात्र त्याने नकार दिला.

महिला मूळची हसूरसासगिरीची

सुनीता देवकाई हिचे मूळगाव हसूरसासगिरी (ता. गडहिंग्लज) आहे. सासर (मनगुत्ती, ता. हुक्केरी) येथील आहे. तिचा दुसरा मित्र पोटे आजरा तालुक्यातील आहे. त्यामुळे या परिसरातील निर्जनस्थळांची त्यांना माहिती होती. यामुळे खून केल्यावर तो परिसरात आणून त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT