‘सोशल मीडिया’वर रंगला जल्लोष
स्टेटस, डीपीवर झळकले विजयी उमेदवार, नेते; क्षणाक्षणाला मतमोजणीच्या अपडेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरून बाजी मारणाऱ्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि अत्यंत काटाजोड लढतीत दुसऱ्यांदा यश मिळविणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा जल्लोष सोशल मीडियावर आज रंगला. त्यांची छायाचित्रे कार्यकर्त्यांच्या स्टेटस, स्टोरी आणि डीपीवर झळकली. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील मतमोजणीची क्षणक्षणाला ‘अपडेट’च्या संदेशांनी गर्दी केली.
या निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीने व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा प्रामुख्याने वापर केला. प्रचार, मतदान, मतमोजणी आणि निकालानंतरही कार्यकर्त्यांनी या प्लॅटफॉर्मवर जल्लोष केला. आपला उमेदवार विजयी होणार याची खात्री बाळगलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची छायाचित्रे काल, सोमवारी आपल्या स्टेटस्, डीपीवर लावली होती. त्यात आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर आणि त्यात आघाडी घेतल्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला. मतमोजणीच्या फेरीनिहाय लीडचे कमी-जास्त होणारे आकडे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केले जात होते. त्यात गाव, प्रभागनिहाय मतदानाची यादी, फेरी, आदी स्वरूपातील माहितीचाही समावेश होता. मतमोजणीची अखेरची फेरी संपेपर्यंत क्षणाक्षणाला सोशल मीडियावर अपडेट देणे कार्यकर्त्यांकडून सुरू होते. मतमोजणी संपल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि विजयाचा जयघोष करणारे व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करुन जल्लोष केला.
...
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी...
‘खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, जे करायचं ते परफेक्ट करायचं, नाद नाही करायचा, कोल्हापुरात मान गादीलाच!’, असे संदेश कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि शाहू छत्रपती महाराज यांच्या छायाचित्रांसह तर ‘एकच वादा धैर्यशील दादा, पुन्हा शिवसेनाच...’ असे संदेश खासदार माने यांच्या फोटोसह महायुतीच्या हातकणंगले मतदारसंघामधील कार्यकर्त्यांनी व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर करत विरोधकांचे चिमटे घेतले. त्यांच्या राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांची छायाचित्रे, जुने संदेशावर मार्मिक टिप्पणीही केली. पराभव झालेल्या उमेदवारांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी जनतेचा कौल मान्य असे स्टेटस ठेवले.
...
छायाचित्रांसह अपडेट
नेटकरी तरुणाईमध्ये सोशल मीडियावर मतमोजणी आणि आपआपल्या भागातील वातावरणाची माहिती देण्याची स्पर्धाच लागली होती. उमेदवारांना मिळालेली मते, शहरात विजयी उमेदवारांच्या शुभेच्छांचे लागलेले फलक, प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ क्षणक्षणाला ते शेअर करत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संदेशांची सोशल मीडियावर गर्दी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.