कोल्हापूर : जिल्ह्यातील केवळ सात साखर कारखान्यांनीच यावर्षीच्या गळीत हंगामात इथेनॉलची निर्मिती केली. या गळीत हंगामात जिल्ह्यात चार कोटी ४४ लाख ७७ हजार ६० लिटर इथेनॉल तयार झाले. भविष्यात अधिकाधिक कारखाने इथेनॉल तयार करतील, असा अंदाज वर्तवला जात असून, त्यासाठी कारखान्यांना भांडवली गुंतवणूकही करावी लागणार आहे.
देशामध्ये इंधनाचे विविध पर्याय अवलंबिले जात आहेत. यासाठी सरकारच्या धोरणातही बदल होत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवले असून, त्यानुसार वाहनांच्या इंजिनमध्येही बदल केले आहेत. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने इथेनॉलस्नेही धोरण बनवल्याने देशभरातील अनेक साखर कारखाने इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत.
जिल्ह्यात अद्याप बहुतांशी साखर कारखान्यांना डिस्लरी नसल्याने इथेनॉल निर्मित करता येत नाही. त्यामुळे क्षमता असूनही अपेक्षित प्रगती करू शकलेलो नाही. जे कारखाने इथेनॉल निर्मितीमधून नफा मिळवतात त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणेही गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरवणे गरजेचे आहे.
साखर कारखाना - इथेनॉल निर्मिती (किलो लिटरमध्ये)
दत्तशिरोळ सहकारी साखर कारखाना- २००९.१
तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना-६५५८.५०
दालमिया भारत साखर कारखाना-१०,८४९.२६
श्री गुरुदत्त शुगर, टाकळीवाडी-१४, ५९३. ५२
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना-९५०.१५
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना-६१०३. ०२
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना-३,२१३
एकूण -४ ४२, ७७. ०६ (किलोलिटर)
इथेनॉलचे दर (प्रतिलिटर रुपये)
मक्यापासून इथेनॉल - ७१.८६
उसापासून (सिरप) इथेनॉल - ६५. ६०
बी. हेवी मोलॅसिस - ६०. ७३
सी. हेवी मोलॅलिस - ५६. २८
खराब धान्यापासून इथेनॉल - ६४
दरातील तफावत
ज्या काळात उसाचा गाळप हंगाम सुरू होता त्यावेळी साखरेपेक्षा इथेनॉलचे दर अधिक होते. त्यामुळे त्याकाळात इथॅनॉल विक्री करणाऱ्या कारखान्यांना अधिक लाभ झाला. मात्र, त्यानंतर साखरेचे भाव वाढले. सध्या साखर ३६०० ते ३७०० रुपये क्विंटल आहे. त्यामुळे इथेनॉलपेक्षा साखर विक्रीतून अधिक नफा मिळतो. भविष्यात गणपती, नवरात्री, दिवाळी याकाळातही साखरेचे भाव वाढतील अशी शक्यता साखर व्यापारी व्यक्त करत आहेत.
इथेनॉलला साखरेपेक्षा अधिक दर मिळतो. त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन वाढले पाहिजे. पण, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यासाठी उसापासून इथेनॉल निर्मितीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी उतरले तरच निर्मिती वाढेल आणि उसाला ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळू शकेल.
- शामराव देसाई, अध्यक्ष, जैवइंधन शेतकरी संघटना
ज्या साखर कारखान्यांना स्वतःची डिस्टलरी आहे तेच इथेनॉलची निर्मिती करू शकतात. साखर कारखान्यांनी आता साखर आणि इथेनॉल यांचा बाजारपेठील दराप्रमाणे समन्वय ठेऊन उत्पादन करावे. त्यातून बाजारातील साखरेचे दरही नियंत्रणात राहतील आणि कारखान्यांनाही पैसे मिळतील.
-विजय औताडे, साखर उद्योग तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.