US Woman Sindhudurg
सावंतवाडी : सोनुर्ली सीमेलगत रोणापाल येथील जंगलात आज एक मूळ अमेरिकन असलेली महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. गुराख्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. मुसळधार पावसात गेले काही दिवस ती याच स्थितीत असल्याचा संशय आहे. तिला नीट बोलता येत नसले तरी आपल्या पतीने छळ करत येथे आणून बांधल्याचा दावा तिने चिठ्ठीद्वारे लिहून केला आहे. गेले ४० दिवस छळ सुरू असल्याचे व तो आपल्याला या अवस्थेत येथे टाकून पळून गेल्याचे तिचे म्हणणे आहे. ललिता काई कुमार एस. (वय ६०, रा. चिंगम रोड, तिरुवन्नामलाई तमिळनाडू) असे त्यांचे नाव आहे. उशिरापर्यंत याबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट झाली नव्हती.
संबंधित महिला सकाळी साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. मला माझ्या पतीने गेले ४० दिवस उपाशी ठेवले आणि प्रकृतीला घातक असणारी औषधे जबरदस्तीने दिली. त्यानंतर माझा छळ करत या ठिकाणी जंगलात बांधून तो पळून गेला, अशा आशयाची चिठ्ठी महिलेने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पोलिसांना दिली. त्या अजूनही बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ पूर्णतः उलगडलेले नाही. त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सावंतवाडी पोलिसांनी तपास बांदा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
सोनुर्ली व रोणापाल गावांच्या मध्यभागी असलेल्या करडाचे डोंगर जंगलमय भागात सकाळी गुराख्यांना जंगलातून कोणाचा तरी आवाज ऐकू आला. सुरुवातीला प्राणी असावा, असे वाटले. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. सतत आवाज येत असल्याने काही ग्रामस्थांनी धाडस करून तेथे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. यावेळी एका झाडाला उजवा पाय साखळदंडाच्या मदतीने बांधलेल्या आणि या साखळीला कुलूप लावलेल्या स्थितीत ती महिला दिसली. बाजूला पाण्याची बाटली, पिशवी व इतर साहित्य पडले होते. त्यांना बोलता येत नव्हते. दीर्घकाळ अन्न पोटात न गेल्याने शरीर आकसलेले होते. कपडेही जीर्ण झाले होते. त्या अत्यवस्थ होत्या. गेले काही दिवस याच अवस्थेत पडून असल्याचे स्पष्ट दिसत होते. गेले तीन-चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात त्या दिवस-रात्र तेथेच होत्या. डासांनी त्वचेवर ठिकठिकाणी चावा घेतला होता. त्यांची अवस्था गंभीर होती.
या जंगलमय भागात जाण्यासाठी रस्ता किंवा पायवाट नसताना या महिलेला तेथे कोणी व कसे नेले, हे गूढ आहे. त्या तीन दिवस येथे असाव्यात, असा अंदाज आहे.
पैसे घ्या, पण सोडवा
संबंधित महिला सुरुवातीला ग्रामस्थांना हात जोडून आपली सुटका करण्याची विनंती करत होती. त्या पैसेही दाखवत पैसे घ्या; पण आपली मदत करा, असे सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्याकडे पाचशेच्या नोटा होत्या. अंगात रेनकोट, सोबत सॅक, चादर, चटई, आधार कार्ड आदी कागदपत्रे होती. सॅकमध्ये असलेल्या आधारकार्डवरून त्यांचे नाव व पत्ता समजून आला; मात्र तीन दिवस तहान-भुकेने व्याकूळ झाल्याने त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी सावंतवाडी पोलिसांचे पथक पोहोचले. संबंधित महिलेला जंगलातून खाली आणण्यासाठी पायवाट करावी लागली. बांधून ठेवल्याने पायाला सूज आली होती. अशक्त बनल्याने त्यांना उभेही राहता येत नव्हते. त्यांना खाली आणायचे कसे, हा प्रश्न होता; मात्र ग्रामस्थांनी तेथील झाडांच्या काठ्या काढून शिडी तयार केली व त्यावर त्यांना झोपवून जंगलातून खाली आणले. रुग्णवाहिका बोलावून त्यांना सावंतवाडीला हलविण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी आधारकार्ड आढळले. त्यावर त्यांचे नाव ललिता काई कुमार एस. (रा. चिंगम रोड, तिरुवन्नामलाई, तमिळनाडू) असे आहे.
सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ग्रामस्थांना सोबत घेत त्या जंगलमय भागात जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. सोनुर्ली ग्रामपंचायतीच्या मागून गेलेल्या रस्त्याने साधारण तीन किलोमीटरवर हा प्रकार घडला. साखळीला कुलूप लावले असल्याने त्यांना ते सोडवता येत नव्हते. घसा कोरडा पडल्याने ती नेमकी काय बोलते, हे समजत नव्हते. त्या इंग्रजीतून काही शब्द बोलत होत्या.
रेल्वे स्टेशन पंधरा मिनिटांवर..
सोनुर्ली-रोणापाल गावांमध्ये जंगलात हा प्रकार घडला, त्या घटनास्थळापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर मडुरा रेल्वेस्थानक आहे. ही महिला व सोबत असलेला संशयित या स्थानकावर उतरून जंगलातून या भागात पोहचला असावा; मात्र त्याने हा प्रकार नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
पती सूत्रधार
येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधित महिलेकडून घटना समजून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र त्यांना नीट बोलता येत नव्हते. अखेर त्यांना कागद आणि पेन देऊन घटना लिहिण्यास सांगण्यात आले. त्यांनी इंग्रजीत आपल्यावर ओढवलेला प्रसंग लिहिला; मात्र त्यातून नेमका घटनाक्रम स्पष्ट झाला नाही. यात त्यांनी गेले ४० दिवस माझा पती चुकीची औषधे देऊन आणि अन्नाविना ठेवून आपला छळ करत होता. त्यानेच आपल्याला येथे आणून बांधले व तू याच जंगलात मरून जाशील आणि मी या गुन्ह्याचा साक्षीदार बनून पळून जाईन, असे म्हटल्याचे नमूद आहे. पोलिसांनी संबंधित महिला मूळ अमेरिकन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.