कोल्हापूर, ता. ७ : कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याच्या प्रकारात कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाच मेपासून घेतलेल्या झडतीमध्ये ४६ मोबाईल, ५ बॅटरी व एक सीमकार्ड मिळाले. कारागृहातील पाण्याचे हौद, शौचालये, बरॅकजवळील मोकळ्या जागेत पुरलेले मोबाईल मिळाले आहेत. याबाबत तुरुंगाधिकारी अविनाश जयसिंग भोई (वय ४२, रा. कळंबा कॉर्टर्स) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
कारागृहामध्ये मार्च महिन्यापासून ऑपरेशन क्लीन कोल्हापूर राबविण्यात येत आहे. मार्चमध्ये प्रभारी म्हणून आलेले अधीक्षक शामकांत शेडगे यांनी शंभरावर मोबाईल शोधून काढले होते. यानंतर आलेल्या विवेक झेंडे यांनीही एप्रिल महिन्यात ५० हून अधिक मोबाईल जप्त केले. यानंतर त्यांनी ही शोधमोहीम आणखी तीव्र केली होती. याला यश मिळत असले तरी मोबाईलचे इतके प्रमाण पाहता कारागृह सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
एखाद्या प्लास्टिक बॅगेत मोबाईल ठेवून ते बरॅकजवळील हौद व इतर ठिकाणी पुरण्यात येतात. कारागृहात ठिकठिकाणी पुरलेले मोबाईल प्रशासनाने शोधून काढून ते जप्त केले. जास्तीत जास्त प्रकार पाण्याच्या हौदाच्या परिसरात घडलेले समोर आले. सकाळी अंघोळीला, तसेच दिवसभरात वेगवेगळ्या कारणांनी पाण्याजवळ जाण्याचा बहाणा करणारे बंदी यामध्ये सक्रिय आहेत.
पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल नेमके कोणाचे हे अद्याप स्पष्ट न झाल्याने अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली. यामध्ये सापडलेल्या एका सीमकार्डमधील माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. या सीमकार्डवरून कोणाकोणाला संपर्क केला, कोणत्या क्रमांकावरून फोन आले? याची माहिती सायबर विभागाकडून मिळताच पुढील कार्यवाही करणार असल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.