Kolhapur North Vidhan Sabha Election 2024 
कोल्हापूर

Kolhapur North Election : उमेदवारीचा घोळ संपता संपेना; महायुती, मविआची दमछाक

Kolhapur Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर या संवेदनशील मतदारसंघातील उमेदवारीसह जागा वाटपाचा घोळ सुरुच आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होऊन तीन दिवस झाले, तरी कोल्हापूर उत्तर या संवेदनशील मतदारसंघातील उमेदवारीसह जागा वाटपाचा घोळ संपता संपेना. ‘उत्तर’च्या उत्तरवरून महायुती आणि महाविकास आघाडीतील या चित्रामुळे कार्यकर्ते, इच्छुकांत अस्वस्थता आहे.

दरम्यान, रोज एक नवी अफवा दोन्ही बाजूंकडून पुढे येत आहे. या अफवांचा खुलासा करताना संबंधित पक्षाच्या नेत्यांसह ज्यांचे नाव पुढे येईल त्यांना त्यावर खुलासा करताना अक्षरशः दमछाक होत आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाणार हे जवळपास निश्‍चित आहे; पण उमेदवार कोण, याविषयी मोठी उत्सुकता आहे.

सुरुवातीला काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी सौ. मधुरिमाराजे यांची नावे समोर आली; पण यापैकी श्रीमती जाधव वगळता अन्य दोघे लढण्यास उत्सुक नसल्याने ती नावे मागे पडली. याशिवाय पक्षांकडे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, आर. डी. पाटील, आनंद माने, दुर्वास कदम, वसंतराव मुळीक अशी इच्छुकांची मोठी यादी तयार झाली. या सर्वांच्या मुलाखती झाल्या.

दोन दिवसांपूर्वी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत या इच्छुकांची बैठक झाली. कोणालाही उमेदवारी दिली तरी त्यांच्या मागे राहू, असा शब्द सर्वांनी दिला; पण बैठक संपताच या इच्छुकांतच एकमत नसल्याचे चित्र पहायला मिळाले.

रोज आणि तासाला वेगवेगळे नाव येत असल्याने कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. काहीशी अशीच स्थिती महायुतीत आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे; पण महिनाभरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातच ‘दक्षिण’वरून कलगीतुरा सुरू आहे. श्री. महाडिक हे उत्तरमधून मुलगा कृष्णराज यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्याला ‘दक्षिण’मध्ये आमची १५ हजार मते असल्याचे सांगत क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर आमचीही ‘उत्तर’मध्ये ८० हजार मते असल्याची आठवण महाडिक यांनी करून दिली. या वादात या जागेचा आणि उमेदवारीचा निर्णय लांबला आहे.

महाडिक-क्षीरसागर यांच्या वादात भाजपकडून पोटनिवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांचे नाव मागे पडत आहे. त्यातून कदम यांच्यासह त्यांना मानणारे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दोन्ही आघाडीतील ही अस्वस्थता संपून उमेदवार आणि जागेचा तिढा कधी सुटणार, याची प्रतीक्षा आहे.

तेज घाटगे यांचे नाव व्हायरल

आज पुन्हा काही नेत्यांची बैठक सुरू असतानाच उद्योजक तेज घाटगे यांचे नाव नुसते समोर आले नाही, तर ते समाजमाध्यमांवर व्हायरलही झाले. घाटगे यांनाच उमेदवारी मिळाल्याची अफवा शहरभर पसरली. त्यावरून त्यांना अनेकांचे फोनही गेले; पण शेवटी आपण या स्पर्धेत नसल्याचा खुलासा करताना त्यांची अक्षरशः दमछाक झाली.

सतेज पाटील दिल्लीला रवाना

‘उत्तर’मधील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले. उद्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ते याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यापूर्वीच त्यांनी नेत्याला नाही, तर सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असे जाहीर केले आहे; पण हा सामान्य कार्यकर्ता कोण आणि त्याचे नाव कधी जाहीर होणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत काँग्रेसमधील हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT