02157
..............
कुत्र्यांचे भुंकणे आणि गव्यांची धूम
गव्यांच्या अटकावासाठी मानवळेच्या शेतकऱ्यांनी लढवली शक्कल
संजय खोचारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव, ता. ३१ ः गव्यांचे कळप शेतात येऊ धुडगूस घालू लागले आहेत. त्यातून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना हा त्रास नित्याचाच झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी कुत्रे भुंकण्याच्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून ते रात्रभर ध्वनिक्षेपकावर लावले आणि काय आश्चर्य... कुत्र्यांच्या आवाजाने घाबरून गवेच येण्याचे थांबले.
माणसाने जंगली प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्याने हत्ती, गवे, बिबटे यांसारखे प्राणी मानवी वस्तीकडे आक्रमण करू लागले आहेत. त्यामुळे या प्राण्यांकडून जीविताहानी बरोबरच पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी शेतात रात्रीच्या वेळी राखण करण्यासाठी जाऊ लागले. शेतातच मचाण उभा करून लगोरी, ढोल बडविणे, शेतात जाळ करणे असे उपाय केले. मात्र, याला न जुमानता जंगली प्राण्यांचा त्रास होऊ लागला.
मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी परिसरातील शिवारात सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे. वरणा, गहू, ऊस, मका, शाळू, हरभरा, तूर, वाटाणा ही पिके घेतली आहेत. गावोगावचे शेतकरी शेतात गवे येऊ नयेत म्हणून रात्रभर राखणीसाठी जातात. शेतात राखणीसाठी मचाण घातले आहेत. काही शेतकऱ्यांनी सोलर झटका कुंपणचा पर्याय वापरला आहे, तर काहींनी शेतात शेकोटी करणे, डबे वाजवणे, फटाके वाजवणे असे पर्याय वापरले आहेत.
गव्यांचे कळपच्या कळप शेतात येऊन पिके फस्त करण्याबरोबरच धुडगूस घालून मोठे नुकसान करत आहेत. या त्रासाला कंटाळलेल्या मानवळेच्या एका शेतकऱ्याने चक्क कुत्रे भुंकण्याचा आवाजाचे रेकाॕर्डिंग केले आणि ते शेतात रात्रभर ध्वनिक्षेपकावर मोठ्या आवाजात लावले. याचा परिणाम असा झाला की, गेले पंधरा दिवस गवे शेतात यायला घाबरत आहेत. ही शक्कल इतर गावांतील शेतकऱ्यांनीही अवलंबली. त्यामुळे सध्या बारवे, मुरुक्टे, मानवळे, गोतेवाडी येथील शेतशिवारात रात्रभर कुत्रे भुंकण्याचा आवाज येत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनी शेतकरी ओरडणारा आवाज, आरोळ्या, वाघाच्या डरकाळीचा आवाज, बदकांचा आवाज रेकाॕर्डिंग करून शेतात मोठ्या ध्वनिक्षेपकाद्वारे लावून गव्यांच्या होणाऱ्या शेतीच्या नुकसानीवर नवा पर्याय शोधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीअंशी निःश्वास सोडला आहे.
.......
जंगली प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळले होते. शेतात कुंत्रे भुंकण्याचा आवाज ध्वनिक्षेपकावरून लावल्याने गवे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. ही शक्कल शेतकऱ्यांनी लढवून आपल्या शेतीचे संरक्षण करावे.
शिवाजी पाटील, प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच, मुरुक्टे
........
यावर्षी गव्यांच्या कळपाने माझे १० क्विंटल आंबेमोहर भात खाऊन फस्त केले. त्यात चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. गोतेवाडी येथील शेतकऱ्यांनी ध्वनिक्षेपकावर कुत्रे भुंकण्याचा आवाज लावणे सुरू केल्याने गवे घाबरून शेतात येण्याचे बंद झाले आहे. पिकांच्या राखणीसाठी हा पर्याय चांगला आहे.
शिवाजी शिंदे, गोतेवाडी
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.