घुणकी : कागल-सातारा दरम्यानचा महामार्ग सहापदरी झालाच नाही तर टोल कशासाठी ?असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने किणी टोल नाक्यावर महामार्ग रोखण्यात आला. टोल वसुली बंद होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार ठेवणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी आज दिला.
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले)येथील टोल वसुली मुदत संपलेली असताना सुध्दा टोल वसुली सुरु असल्याच्या निषेधार्थ व टोल वसुली बंद करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्यावतीने टोल बंद आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी अंगावर काळे कपडे परिधान करून, डोळ्याला काळी पट्टी बांधून व न्याय देवतेचा तराजू हातात घेऊन अनोख्या पध्दतीने यावेळी किणी टोलनाक्यावर आंदोलन झाले. मुदत संपली, टोल बंद झालाच पाहिजे. रस्ते आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे टोल बंद झालाच पाहिजे, राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय या घोषणांनी परीसर दणाणून निघाला. दरम्यान श्री. जाधव यांनी टोल व्यवस्थापक संजय लांडगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनातील आशय असा--गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली सुरू आहे. २ मे २०२२ रोजी टोलची मुदत संपली आहे. तरीही कोरोना, महापूर, नोटाबंदी याची कारणे सांगून टोलची मुदत पुन्हा दीड| महिन्यांनी वाढवून घेण्यात आली. किणी, तासवडे टोलनाक्यावर जमाखर्चाचा इलेक्ट्रिक बोर्ड लावण्याचे शासनाचे बंधनकारक असताना लावला जात नाही. शासकीय अधिकारी पाकीट संस्कृतीमुळे दुर्लक्ष करतात. किणी, तासवडे टोलनाक्यावर वाहनधारकांना मारहाण, गुंडगिरीतून लोकप्रतिनिधी आणि वाहनधारक सुटलेले नाही. १५ ते १८ किलोमीटर परिघातील गांवांना टोल हा माफ आहे. नियम धाब्यावर बसवून वसुली सुरू असल्याने गोरे गेले आणि टोलच्या माध्यमातून काळे आले असे म्हणण्याची पाळी वाहनधारकांच्यावरआली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील किणी, व सातारा जिल्हयातील तासवडे हे दोन्ही टोलनाके २४ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास हस्तांतरीत करण्यात आले. त्यानंतर पुन्हा टोल वसूली सुरू करण्यात आली. या टोलसाठी सहापदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे. पण सहा पदरी झालाच नाही तर टोल कशासाठी ? आता महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून वाहनधारकांची होणारी लूट थांबवण्याची गरज आहे. आता पर्यत कामाचा दर्जा न तपासता नुसते टोलवसूलीचे धोरण अवलंबले आहे. रस्त्याची दुरावस्था, झाडांची निगा नाही, अस्ताव्यस्थ झाडे, महामार्गावर खड्डे, यामुळे कित्येक अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला शासनाच्या नियमानुसार वाहनधारकांच्यासाठी बाथरूमची सोय नाही.
या आंदोलना वेळी राजू जाधव, प्रवीण पाटील पैलवान, नागेश चौगुले, संतोष चव्हाण, फिरोज मुल्ला, वैभव हिरवे, राज मकानदार, नयन गायकवाड, अशोक पाटील, सरदार खाटीक, गणेश बुचडे, अजित पाटील वाठार, मोहन मालवणकर, किरण बेडेकर, अभिजित राऊत, मंदार जाधव, संजय पाटील, कृष्णात दिंडे, किरण पोतदार, राहूल खंडागळे, ओकांर पाटील, संजय पाटील आवळी, अमोल पाटील, शिवाजी मगदूम, श्रीकांत वंदूरे, राजू पाटील पोर्ले, अशोक पाटील चिखली, सुनिल निरंकारी, नाना सावंत, विकी मिसाळ, मनिष क्षीरसागर, अजय चौगुले, भिमराव खानविलकर, केदार पाटील, राजू सावंत, इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.