काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांचा एबी फॉर्म तयार आहे. शिवसेनेने तयारी दर्शवली, तर ते काँग्रेसकडून लढतील, असे जाहीर केले होते.
सांगली : उत्तर मुंबई मतदार संघ (North Mumbai Constituency) शिवसेना (ठाकरे) गटाला देण्याच्या बदल्यात सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघ काँग्रेसला द्यावा, हा प्रस्ताव शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे दिल्लीतून काँग्रेसने केलेला शेवटचा प्रयत्नदेखील असफल झाला आहे. विशाल पाटील (Vishal Patil) यांना आता बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणूनच सांगलीत लढावे लागणार आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगली लोकसभा मतदार संघ शिवसेनेला (Shiv Sena) जाहीर करण्यात आल्यानंतर या विषयावर जवळपास पडदा टाकण्यात आला होता. आमदार विश्वजित कदम यांनी, एक शेवटचा प्रयत्न म्हणून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू, असे जाहीर केले होते. काँग्रेसमध्ये (Congress) जोरदार पडसाद उमटले होते.
काँग्रेस कमिटीवरील ‘काँग्रेस’ शब्दाला रंग फासण्यात आला होता. त्यानंतर विशाल यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे दाखवून दिले. त्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा हालचाली गतिमान केल्या. त्यात ‘उत्तर मुंबई’च्या जागेवरून एक आशेचा किरण काँग्रेससाठी निर्माण झाला होता.
या जागेवर काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही, शिवसेनेकडे श्रीमती घोसाळकर या पर्याय आहेत. त्यामुळे शिवसेनेने उत्तर मुंबई घ्यावी आणि त्या बदल्यात सांगली काँग्रेसला सोडावी, हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दिल्लीतून काही लोक त्यासाठी आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यावर खल सुरू होता.
चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी आणि त्या बदल्यात त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, असा प्रस्तावदेखील काँग्रेसकडून देण्यात आला होता. आमदार विश्वजित कदम हेही चंद्रहार पाटील यांच्याशी या विषयावर बोलले होते. परंतु, शिवसेना पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ही कोंडी शेवटपर्यंत फुटू शकली नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांचा एबी फॉर्म तयार आहे. शिवसेनेने तयारी दर्शवली, तर ते काँग्रेसकडून लढतील, असे जाहीर केले होते. ऐनवेळी घडामोड झाल्यास तांत्रिक अडचण नको म्हणून हा फॉर्म कोल्हापूर येथील काँग्रेस नेत्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र तो सांगलीपर्यंत पोहोचू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.