कोल्हापूर- विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला आहे. विशाळगडावर दगडफेक आणि घरांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या हा मुद्दा तापला आहे. याच पार्श्वभूमीवर विशाळगडाचा इतिहास काय आहे? विशाळगडावर जी दर्गा आहे त्याचा इतिहास काय? याची माहिती आपण जाणून घेऊया...
विशाळगड हा शिवकालीन डोंगरी किल्ला आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पर्वतश्रेणीत हा किल्ला वसला आहे. कोल्हापूरवरून या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तासांचा (७२ किमी) कालावधी लागतो. किल्ला केव्हा बांधला याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. पण, शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने ११ व्या शतकात पंधरा किल्ले बांधले होते. त्यातील हा एक किल्ला असावा असं म्हटलं जातं.
विशाळगडाचे पूर्वीचे नाव खेळणा होते. पण, प्रतापगडाच्या १६५९ च्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा जिंकला. त्याबरोबर खेळणा देखील महाराजांच्या साम्राज्यात सामिल झाला. महाराजांनी या किल्ल्याला विशाळगड असे नाव दिले. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जोहार महाराजांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्याच्या वेढ्यातून सुटून महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर आश्रयासाठी आले होते. यावेळी गजापूरच्या खिंडीत शत्रूला बाजीप्रभू देशपांडेंनी रोखले होते. या लढाईत त्यांनी प्राण ठेवला होता.
बरीच वर्षे विशाळगड मराठ्यांच्या ताब्यात होता. पण, मोगल सेनानी झुल्फिकार खानाने विशाळगड जिंकून घेतला. महाराणी ताराबाईंनी हा किल्ला पुन्हा मिळवला आणि आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवले. १७०२ मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर हा किल्ला औरंगजेबाने मिळवला. पुढे तो मराठ्यांकडे गेला अन् शेवटपर्यंत मराठ्यांकडेच राहिला.
विशाळगडाच्या प्रतिनिधी घराण्याचा मुळ पुरुष परशुराम त्रिंबक यांना ओळखले जाते. कोल्हापूरच्या छ. संभाजीराजेंनी नवीन सनद काढून इनाम सुरु ठेवले होते. काही काळ किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता. या काळात किल्ल्याचे मोठे नुकसान झाले. विशाळगडावर काही अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावर पडझड झालेले काही मंदिरं आहेत. काही समाध्या आहेत. किल्ल्यावर हजरत मलिक रहान दर्गा देखील आहे. पिराचे दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुसलमान दोघे येत असतात.
विशाळगडाच्या किल्ल्याबाबत इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी 'सकाळ'ला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, औरंगजेबाने ६ जून १७०२ ला विशाळगड किल्ला जिंकला. औरंगजेबाने सहा ते सात महिने या किल्ल्याला वेढा घातला होता. किल्ला जिंकल्यानंतर दोन दिवसाने औरंगजेबाने खपरेल मशिद किंवा पीर मलिक रेहान दर्ग्याच्या कबरीपाशी जाऊन नमाज पढली. त्यामुळे ही दर्गा १७०२ आधी देखील विशाळगडावर होती असं आपण म्हणू शकतो.
सावंत पुढे म्हणाले की, विशाळगडावर दर्गा होता याचा अर्थ मराठ्यांनी याला हाणी पोहोचवलेली नव्हती. ती जशीच्या तशी होती. पण, नेमकी कधीपासून ही दर्गा किल्ल्यावर होती. हे निश्चित सांगता येणार नाही. याआधीचे दर्ग्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत. पण, दर्गा फार पूर्वीपासून तेथे नव्हता असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही.
मलिक रेहानबाबत बोलताना सावंत म्हणाले की, मलिक रेहान कोण होता याबाबत आतापर्यंत काही पुरावे सापडलेले नाहीत. शिलालेख किंवा दस्ताऐवजामध्ये देखील कुठेच मलिक रेहानचा उल्लेख आढळून आला नाही. पण, मलिक रेहान हा विशाळगडाचा किल्लेदार असण्याची शक्यता आहे. त्याने किल्ल्याचा चांगला कारभार केलेला असू शकतो, त्यामुळे त्याची कबर त्याठिकाणी बांधलेली असू शकते. पण, याबाबत आपल्याला निश्चित किंवा ठामपणे काही सांगता येणार नाही. विशेष म्हणजे, केवळ मुस्लीम नाही तर हिंदू देखील दर्ग्यामध्ये डोकं टेकवण्यासाठी येत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.