कोल्हापूर - विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गजापूर येथे रविवारी (ता.१४) झालेल्या जाळपोळ, तोडफोडीसह घरांवर केलेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी आज ५०० संशयितांवर चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आतापर्यंत २१ जणांना अटक केली आहे. त्या सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अटक केलेले सर्वजण कोल्हापूर व परिसरातील रहिवासी आहेत.
दरम्यान, कारवाईची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात ठाण मांडून कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देऊ नका, माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करा, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला. गजापूरमधील घटनेचे समर्थन करत नाही. मात्र दीड वर्षापूर्वीच अतिक्रमणे काढली असती तर ही वेळ अाली नसती, असेही त्यांनी सांगितले.
विशाळगडावरील अतिक्रमणांच्या निषेधार्थ संभाजीराजे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी ‘चलो विशाळगड’चा नारा दिला होता. गडावर कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दुसरीकडे पायथ्याला थांबलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी पायथ्यापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर येथील घरे, वाहनांवर तुफान दगडफेक केली होती.
विशाळगडावरील ७० अतिक्रमणे जमीनदोस्त
विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू होती. प्रशासनाने शासकीय महाभियोक्ता यांच्याकडून अतिक्रमण निर्मूलनाबाबत अभिप्राय मागविला होता. याचिकाकर्त्यांना स्थगनादेश आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील, असा अभिप्राय दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.