-प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या ८९ ठिकाणांच्या परिसरात गेल्या काही वर्षांत डोंगर माथ्यावरील सपाटीकरण, उत्खनन, डोंगर फोडून केलेली बांधकामे, बेसुमार वृक्षतोड सर्रास सुरू आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना नित्याच्याच घडतात. मात्र, हे प्रकार असेच सुरू राहिले तर भूस्खलनाची मोठी घटना होण्याची शक्यता आहे. नुकत्याच केरळ येथील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनाच्या (Wayanad Landslide) घटनेमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे.
अतिवृष्टीसह इतर कारणांमुळे येथे भूस्खलनाचा धोका अधिक वाढला आहे. भूगर्भ शास्त्र संशोधक व अभ्यासकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाला अहवालही सादर केले आहेत. संशोधकांच्या अभ्यासानुसार काही वर्षांत डोंगर माथ्यावरील बेसुमार वृक्षतोड, रस्ते आणि अवैध बांधकामे यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठून पुढे ते झिरपत झिरपत खालच्या बाजूवर दबाव टाकत राहते.
उन्हाळ्यात झाडे नसल्याने जमीन मोठ्या प्रमाणात तापून पहिल्या पावसात त्यात भेगा पडतात. त्यावर मोठा पाऊस झाला की, हजारो टन पाणी मुरत ते खालच्या बाजूला वाहून जाते. यामुळे येथील जमिनी व डोंगर उताराची भरपूर झीज व विदारण होते. तसेच ही जमीन क्षतिग्रस्त आणि भुसभुशीत झाल्यामुळे त्याची स्थिरता संपून जाऊन सोबत दगड, उरली सुरली झाडे आणि बांधकामे वाहून जाऊन प्रचंड असे भूस्खलन होते. त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये जमिनीच्या मूळ रचनेत सुरुंग लावून किंवा भूमी उपयोजनेत बदल केले आहेत. तसेच पाण्याचे मूळ प्रवाह बदलून, ते मुजवून त्यात बांधकामे झाली आहेत. अशा कारणांमुळे भूस्खलनाचे धोके अधिक वाढले आहेत.
कोणत्याही प्रदेशाची आपत्ती प्रवणता ठरविताना विकासकामामुळे निसर्गाचा समतोल किती बिघडेल, याचे नेमके मूल्यमापन होणे गरजेचे आहे तसेच भू-माहितीशास्त्राच्या सहाय्याने भूस्खलनप्रवण नकाशे तयार करणे हेही महत्त्वाचे आहे. यामुळे आपण कमीत कमी जीवितहानी आणि वित्तहानी रोखू शकतो.
-डॉ. अमोल जरग, भू-माहितीशास्त्राचे अभ्यासक
भूस्खलनाला प्रमुख कारण हे अतिवृष्टी आहे. त्याचबरोबर नैसर्गिक डोंगर उतारांवर बांधकामे करणे, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बदलणे अशी अनेक कारणेही आहेत. हा धोका टाळण्यासाठी भूस्खलन परिसरातील डोंगर उतारांवरील बांधकामांसह ओढे, नाले वळविणे टाळले पाहिजे.
-प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
राधानगरी ३१
शाहूवाडी २०
भुदरगड ११
पन्हाळा ०९
करवीर ०४
आजरा ०४
गगनबावडा ०४
कागल ०३
गडहिंग्लज ०१
हातकणंगले ०१
चंदगड ०१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.