Witchcraft in Kaulav Village esakal
कोल्हापूर

गुप्तधनासाठी घरात खड्डा खोदला, मांत्रिकाला बोलवलं अन् नरबळी..? कौलवमधील थरारक प्रकाराने पंचक्रोशी हादरली

नरबळीची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. यामुळे सरपंचांनी थेट शरद मानेच्या घरात शिरण्याचे धाडस केले.

सकाळ डिजिटल टीम

गावात काही तरी अघोरी प्रकार सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घबराटीचे वातावरण होते. नरबळीच्या चर्चेला ऊत आल्याने आपली मुलेही घराबाहेर सोडणे गावकऱ्यांनी बंद केले होते.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : रात्री अकरानंतर अनोळखी लोकांचा गावात शिरकाव... साखर कारखान्यावरील कर्मचाऱ्याचा घरात काहीतरी अघोरी (Witchcraft) प्रकार सुरू असल्याची कुणकुण... नरबळीच्या अफवेने गावातील मुलांना कोणी बाहेर सोडेना... शंकास्पद हालचाली अन्‌ घरातून धूर, धूप, मंत्रांचा आवाज... सरपंचांनी धाडस करून घरात प्रवेश करताच गुप्तधनाच्या लालसेने घरात मोठा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला. मांत्रिकासह साथीदारांची धावपळ उडाली.

‘कोण आहे तो, पकडा रे त्याला’ असे शब्द कानावर पडताच सरपंचांनी तिथून काढता पाय घेत थेट पोलिस ठाणे गाठले. राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील कौलव येथे मंगळवारी रात्री घडलेल्या या थरारक प्रकाराने पंचक्रोशी हादरून गेली आहे.

कौलवमधील शरद धर्मा मानेचे चौकोनी कुटुंब. तो स्वतः साखर कारखान्याचा हंगामी कर्मचारी असून, अल्पभूधारक आहे. कराडचा मांत्रिक महेश काशीदने त्याला गुप्तधनाचे आमिष दाखवले होते. पत्नी, दोन मुलांसह राहणाऱ्या शरदने यासाठी ५० हजार रुपये मोजल्याची चर्चाही सुरू आहे. गेले चार-पाच दिवस शरद मानेच्या घरी काही तरी सुरू असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती, पण चौकशी कोण करणार, असा सवाल सर्वांना पडला होता.

दररोज रात्री अकरानंतर मांत्रिक दाखल

शरद माने याचे चार खोल्यांचे घर आहे. समोरील सोपा रिकामा होता, तर आतील देवघराशेजारील खोलीत पूजा मांडली होती. देवघरातच काही जण खड्डा खणत होते. दररोज रात्री अकरानंतर चार ते पाच अनोळखी लोक त्याच्या घरात दाखल व्हायचे व पहाटे निघून जायचे. हा प्रकार अनेकांच्या नजरेतही आला होता.

घरात घुसून दाखवले धाडस

ग्रामस्थांनी सरपंच रामचंद्र कुंभार यांना फोन करून याची माहिती दिली. नरबळीची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. यामुळे सरपंचांनी थेट शरद मानेच्या घरात शिरण्याचे धाडस केले. घराबाहेर थांबलेल्या मानेच्या एका मुलाने त्यांना अडविण्याचा प्रयत्नही केला. पण, त्यांनी थेट घरात प्रवेश करताच अघोरी पूजा व खड्डा खोदाई सुरू असल्याचे पाहिले. याविषयी विचारणा केली असता शांती सुरू असल्याची बतावणी माने याने केली; पण परिस्थिती लक्षात घेऊन सरपंच बाहेर आले. ‘कोण आहे, पकडा रे त्याला’ असे वाक्यही कानावर पडल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यांनी याची माहिती पोलिसपाटील, तंटामुक्ती सदस्यांना देऊन राधानगरी पोलिसांना बोलावून सहा संशयितांना पकडले.

घरकुल योजनेचे काम असल्याची दिशाभूल

गुप्तधनापोटी माने याने संशयितांना घरी येण्याची वेळही रात्री अकरानंतरची दिली होती. घरात खोदाई केल्याचे लक्षात आल्याने काहींनी विचारणा केली असता घरकुलचा निधी मिळाला असून, बांधकाम करणार असल्याची खोटी माहिती माने गावकऱ्यांना देऊन दिशाभूल करीत होता. मात्र, गुप्तधनासाठी त्याने देवघरातच हा खड्डा खोदल्याचे दिसून आले.

अमावास्या दोन दिवसांवर, ग्रामस्थ बैचेन

गेले चार-पाच दिवस चर्चा सुरू होती. खड्डे खणणारे, रात्री अकरानंतर येत होते. मंगळवारी सायंकाळी ते सात वाजता आल्याने संशय बळावला होता. अमावास्या अवघ्या दोन दिवसांवर असल्याने वेगवेगळ्या अफवा कानावर आल्याने ग्रामस्थ बैचेन होते. मानेच्या घरातही हळद, कुंकू, टाचण्या मारलेला लिंबू, नारळ असे साहित्य मिळून आल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

मुलांना घराबाहेर सोडणे बंद

गावात काही तरी अघोरी प्रकार सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घबराटीचे वातावरण होते. नरबळीच्या चर्चेला ऊत आल्याने आपली मुलेही घराबाहेर सोडणे गावकऱ्यांनी बंद केले होते. मुलांना शाळेत सोडल्यानंतर ती परत येतील की नाही, याचीही चिंता ग्रामस्थांना सतावत होती. याच कारणाने मुलांना बाहेर सोडणे पालकांच्या चिंतेत भर टाकणारे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT