कागल, कोल्हापूर : सर्वत्र देशभक्तीपर गीतांची धुन होती. अनेकांच्या घरी जिलेबी होती. ध्वजवंदनामुळे संपूर्ण कागल मध्येही मंगलमय आणि देशभक्तीपर वातावरण होते. याच स्वातंत्र्यदिनादिवशी दुपारी दोन वाजता कोल्हापुरातून कागल कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृतदेह आला. नातेवाईकांना त्याचा चेहरा दाखविला आणि त्यांनी स्वतःच कर्मचाऱ्यांची वाट न पाहता रॅपरमध्ये मृतदेह गुंडाळण्यास सुरवात केली. पॉझिटीव्ह मृतदेहाचे नातेवाईक बाजूलाच थांबले होते. काही मिनिटांत रॅपर मध्ये गुंडाळलेला मृतदेह नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी अंत्यसंस्कार केले. सर्व काही झाल्यानंतर नातेवाईकांना समजले की डॉक्टरांचे आई-वडील सुद्धा पॉझिटीव्ह आहेत. तेही कोल्हापुरात उपचार घेत आहेत. मात्र डॉक्टर कागल कोविड केअर सेंटर मध्ये इमानेइतबारे सेवा बजावत आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या या डॉक्टरांचे नाव आहे अभिजित शिंदे.
डॉ.शिंदे हे मुळचे हुपरी (ता. हातकणंगले) येथील आहेत. डॉ. शिंदे हे सध्या कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कागल कोविड केअर सेंटरचाही पदभार त्यांच्याकडे आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी एक घटना घडली आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेचा आणखी एक पदर सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. ग्रामीण भागातील एका 72 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसताच गडहिंग्लज येथील शेंद्री माळावरील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. दोन-तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी दवाखान्याकडे पाठविण्यात आला त्यांना घेऊन सरकारी रुग्णवाहिका त्या खासगी दवाखान्याच्या दारात पोचताच त्यांचा मृत्यू झाला. रूग्णवाहिका तशीच कागल कोविड केअर सेंटरमध्ये आणली गेली. स्वॅब देण्यासाठी तिथे आलेल्या नातेवाईकांना मृतदेह दाखविण्यात आला. सर्वजण दूर राहिले. आणि डॉक्टरांनी सेंटर मधील इतर कर्मचाऱ्यांची वाट न पाहता मृतदेह थेट रॅपरमध्ये गुंडाळण्यास सुरवात केली. थोड्याच वेळात त्यांनी तो मृतदेह कागल नगरपालिकेच्या स्वाधीन केला. कागल नगरपालिकेच्यावतीने कागलच्या स्मशानभूमीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
"रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा'
डॉ.अभिजित शिंदे हे ऑल राऊंडर आहे. या केंद्रात एक्सरे मशिन आहे. पण टेक्निशियन नाही. त्यामुळे अनेक वेळा तेच स्वतः रुग्णाचा एक्सरे काढतात. कोल्हापूर शहरात बेड मिळाला नाही म्हणून पुन्हा गावाकडे आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह आठ पैकी सहा रुणांना त्यांनी बरे केले आहे. आणखी दोन बरे होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी नोकरीतही "रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा' म्हणून काम करणारे डॉ.शिंदे खरोखरच "ऑल राऊंडर' आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.