सांगली : जिल्ह्यात कधीकाळी एक पडदा चित्रपटगृहांचाही सुवर्णकाळ होता. जवळपास तीस चित्रपटगृहे होती. त्यापैकी आजघडीला दहा चित्रपटगृहे सुरू आहेत. यासाठीच म्हणायचे की तिथे कधी मधी एखादा दुसरा चित्रपट प्रदर्शित होतो. तिथे प्रेक्षक किती येतात हा भाग वेगळा. केवळ कायदेशीर बंधणामुळेच ही चित्रपटगृहे सुरू आहेत.
एक एक करीत एक पडदा चित्रपटगृहांना टाळे लागण्यास सुरवात होऊनही आता दशक दीड दशकांचा कालावधी लोटला आहे. १९९२ मध्ये आपल्या विविध मागण्यांसाठ चित्रपटगृहाच्या मालकांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यानंतर एक पडदा चित्रपटगृहांच्या जागेवर काही अटींना अधीन राहून चित्रपटगृहांच्या जागेच्या विकासाला मुभा मिळाली तरी त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. कधी काळी तालुक्याच्या गावापर्यंत सुरू झालेली कायमस्वरुपी थिएटर हळू हळू बंद पडत गेली.
तालुकानिहाय आढावा घ्यायचाच झाल्यास जतमध्ये तीनपैकी एकच थिएटर सध्या सुरु आहे. कवठेमहांकाळमध्ये प्रकाश बंद पडले आणि अंबिका कसेबसे सुरू आहे. सांगलीत प्रताप, सरस्वती, समर्थ, जयश्री, स्वरुप, सदासुख, त्रिमुर्ती, माळी, पद्मा अशी चित्रपटगृहे सुरू होती. सध्या फक्त ‘आनंद’च सुरू आहे. इस्लामपूरमध्ये जयहिंद, मानकेश्वर, शिवपार्वती अशी तीनही सुरु आहेत. पलूसमध्ये शिवशंकर बंद तर मिनाक्षी सुरु आहे. आटपाडीत शिराळा, तासगाव येथील चित्रपटगृहे बंद पडून जमाना लोटला. विट्यात ‘प्रसाद’ बंद असून ‘भैरवनाथ’ बंद पडले आहे.
सांगलीच्या चाफळकर कुटुंबाने चित्रपट प्रदर्शनात राज्यभर व्याप वाढवला. एक कुटुंब म्हणून त्यांनी या व्यवसायाकडे पाहिले. त्यांच्याशिवाय आपटे, बजाज, मिरजेतील देवल, जामदार, डोणगे, गाढवे या कुटुंबांनी चित्रपटगृहे जपली. मात्र काळाच्या ओघात ही चित्रपटगृहे टिकवणे अवघड गेले. आजघडीला अनेक चित्रपटगृहे उजाड अवस्थेत आहेत. त्यांची अवस्था कोणाही चित्रपट रसिकाला वेदना देणारी आहे. या जागांवर कात टाकून नवी चित्रपटगृहे उभी राहतील ही आता वेडी आशाच. मात्र ती उभी राहावीत असे प्रत्येका वाटते. या काळातच दीड दशकापूर्वी सांगलीत न्यू प्राईडच्या रुपाने पहिले मल्टिप्लेक्स सुरू झाले. त्यानंतर एसएफसी मॉल ‘मुक्ता’ आणि विश्रामबागला ‘ऑरम’ अशी दोन बहुपडदा चित्रपटगृहे सुरू झाली.
‘न्यू प्राईड’ राज्यातील पहिले अत्याधुनिक थिएटर
एकीकडे चित्रपटगृहांसमोरचा अंधार वाढत असताना अलीकडच्या काळातील आशेचा किरण म्हणजे बायपास रस्त्यावरील न्यू प्राईड थिएटर. त्याचे आता नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच अत्याधुनिक असे थिएटर होत आहे. झोपून (लाउंजर) आणि आराम खुर्चीत सिनेमा पहायची इथे सोय असेल. न्यू प्राईडचे संचालक समिर शहा म्हणाले,‘‘ दक्षिणेत अशा थिएटर्स आहेत. तेथे तीन पडदे असतील. साऱ्या स्क्रीन थ्रीडी आहेत. तसेच साऊड लाईन आरे ऑटमॉस सिस्टिम याठिकाणी बसविण्यात आली आहे. यामुळे इतर थिएटर पेक्षा ४० टक्के आवाज स्पष्ट ऐकू येईल. याशिवाय आकर्षक वास्तूरचनाही करण्यात आली आहे. सेंट्रल एसीची सुविधाही येथे आहे. एका बाजूला रिलायन्स मार्ट आणि दुसऱ्या बाजूला थिएटर अशी संकल्पना आहे. सांगलीकरांना मनोरंजनाची ही एक पर्वणीच ठरेल. थिएटरचे ९० टक्के काम झाले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.