Nagpur to Goa Shaktipeeth Expressway Highway esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shaktipeeth Highway : लोकसभा संपताच 'शक्तिपीठ'ची अधिसूचना जारी; शेतकरी, नेत्यांकडून ताकदीने विरोधाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे.

सांगली : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) निकाल लागताच बहुचर्चित नागपूर ते गोवा शक्तिपीठ द्रुतगती राज्य महामार्गासाठी (Nagpur to Goa Shaktipeeth Expressway Highway) जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज तालुक्यांत जमिनी घेतल्या जाणार आहेत. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा अनावश्‍यक महामार्ग आहे. त्यात पिकाऊ जमिनींचे नाहक नुकसान होणार असल्याने तो आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. तो विरोध डावलून महामार्ग रेटण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू झाला आहे.

शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासून तो वादात सापडला आहे. केंद्र सरकारचा (Central Government) रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग अंकलीपर्यंत कार्यान्वित झाला आहे. राज्य सरकारला नागपूर आणि गोवा जोडायचे असेल तर या मार्गाला कोल्हापूरपासून पुढे कनेक्ट करता आले असते. शिवाय, कोल्हापूर (श्री महालक्ष्मी), तुळजापूर (भवानी माता) आणि माहूर (रेणुका माता) ही शक्तिपीठे जोडायची असतील तर रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला उपरस्ते करता आले असते. हे न करता नवीन महामार्गाचा घाट का घातला गेला आहे, असा सवाल करत शेतकरी व आंदोलक आक्रमक झाले आहेत.

या महामार्गाला होणारा तीव्र विरोध लक्षात घेत लोकसभा निवडणुकीपर्यंत पुढील कार्यवाही स्थगित केली होती. निवडणूक संपल्यानंतर आता पुन्हा एकदा अधिसूचना जारी केली असून, हरकती मागवल्या आहेत. या महामार्गाचा सांगली जिल्ह्यापुरता विचार केला तर तो रत्नागिरी-नागपूर महामार्गाला समांतरच जातोय. दोन्ही महामार्गात सरासरी १० ते १५ किलोमीटरचे अंतर आहे. माजी खासदार राजू शेट्टी, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांच्यासह कृती समितीने या विरोधात शड्डू ठोकला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर या महामार्गाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

रत्नागिरी-नागपूर महामार्ग तोट्यात

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ सध्या नागपूर ते अंकली (सांगली) कार्यान्वित झाला आहे. त्याला एक वर्षाहून अधिक काळ झाला. शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील टोलनाक्यावर महिन्याची टोल वसुली सुमारे सात ते आठ लाखांवर आहे. हा आकडा तोट्याचा आहे. कारण इथे किमान ४० लाखांवर वसुली गेली तरच वेळेत वसुली होणार आहे. अशावेळी समांतर नवा रस्ता कशासाठी, असा सवाल उपस्थित केला आहे.

या गावांत होणार जमीन अधिग्रहण

कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, तासगाव तालुक्यांतील डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडी, गव्हाण, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव कवठे, मिरज तालुक्यांतील कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी.

पुढील दिशा उद्या ठरणार

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने या विषयावर पुढील दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी (ता. १३) सकाळी ११.३० वाजता बैठक बोलावली आहे. खणभागातील कष्टकऱ्यांची दौलत इमारतीत ही बैठक होणार आहे, अशी माहिती निमंत्रक उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रमेश एडके, यशवंत हारुगडे, उजय पाटील यांनी दिली.

मंगळवारी कोल्हापुरात मोर्चा - सतेज पाटील

काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावरची लढाई छेडली आहे. ते म्हमाले, ‘‘समृद्धी महामार्गाने सरकार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे. त्यातूनच ‘शक्तिपीठ’ रेटला जातोय, मात्र हा अनावश्‍यक मार्ग आहे. त्याला समांतर महामार्ग असताना नवा कशाला हवा? रत्नागिरी ते नागपूर महामार्ग करताना एकाही शेतकऱ्याने, गावाने विरोध केला नाही. कारण, तो रस्ता गरजेचा होता. शक्तिपीठ मार्गाची गरज नाही. त्याने शेती बुडेलच, शिवाय भरावाने महापुराचे संकट आणखी वाढणार आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही १८ जून रोजी कोल्हापुरात महामोर्चा घेतोय. सांगलीचे लोकही त्यात सहभागी होतील. हा रस्ता आम्ही होऊ देणार नाही.’’

महामार्ग होऊ देणार नाही - राजू शेट्टी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा पुन्हा एकदा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. समृद्धी महामार्गाने एका विधानसभेचा खर्च काढला. आता शक्तिपीठ महामार्ग करून पुढील निवडणुकीचा खर्च काढण्याचे धोरण दिसते आहे. हा शक्तिपीठ जोडणारा नव्हे तर विधानसभेला आर्थिक शक्ती वाढवणारा रस्ता आहे. किमान समृद्धीला चौपट, पाचपट दर मिळाला. इथे तेही मिळणार नाही. रत्नागिरी-नागपूर रस्ता आहेच की... आर्थिक हव्यासापोटी हे सगळे सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सांगेल, रत्नागिरी नागपूर रस्ता सध्या फायद्यात नाही. शिरढोण टोल नाक्यावर चाळीस लाख रुपये कलेक्शन व्हायला हवे. सात ते आठ लाख होत आहे. मग समांतर रस्ता जात आहे. मग गरज काय आहे? त्यांचा टोल अजून चार लाखांनी कमी येणार आहे. हे कर्ज डोक्यावर येणार आहे. फार हव्यास असेल तर नागपूर ते पंढरपूर करा, मग ठरवा. कारण, इकडे जमिनी पिकाऊ आहेत, किमती जास्त आहेत. घेराओ घालू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT