Sangli Congress Politics esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : सांगलीच्या काँग्रेसवर ही वेळ का आलीये? जयंतरावांनी नेहमीच काँग्रेस खिळखिळी करण्याचा केला प्रयत्न!

सन २०१४ ला मोदी लाटेत सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा धुव्वा उडाला.

शेखर जोशी shekhar.vjosh@gmail.com

सांगली काँग्रेसच्या हातून गेली, हे वृत्त एकूणच राजकारणात धक्कादायक होते. वसंतदादांची सांगली काँग्रेसशिवाय हा धक्का होता, आणि त्या रागातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनला कुलूप घातले होते.

Sangli Congress Politics : ज्याअर्थी, काँग्रेस सांगलीचा उपयोग महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या ‘बार्गेनिंग’साठी करत आहे, त्याअर्थी येथील त्यांच्या पक्षाची लढण्याची उमेद संपली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. २०१९ मध्ये ही जागा आघाडीच्या सौद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केली. स्वाभिमानीकडे उमेदवार नसताना त्यांनी ती घेतली. यावेळी शिवसेना (ठाकरे) ती मागते आहे, गंमत म्हणजे त्यांच्याकडेही मेरिट असलेला स्वतःचा उमेदवार नाही. या स्थितीत काँग्रेस (Congress) हतबल झाल्यासारखी दिसते आहे. यामागे काही कारस्थान असेलही, मात्र त्याला जबाबदार काँग्रेसच आहे.

सन २०१४ ला मोदी लाटेत सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा धुव्वा उडाला. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील (Pratik Patil) साडेतीन लाख मतांनी पराभूत झाले. इंदिरा गांधी पराभूत झाल्या, तेव्हाही जिंकली होती, ती सांगली यावेळी हातातून सटकली. परंतु, त्यानंतर एका पराभवाने नेस्तनाबूत झालो, संपलो, अशी भूमिका जणू काही काँग्रेस नेत्यांनी घेतली. भाजपच्या झंझावातापुढे देशात जी अवस्था काँग्रेसची झाली, त्याहून अधिक वाईट जिल्ह्यात झाली. एकीकडे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आधी सुरुंग लावून खच्चीकरण केलेल्या काँग्रेसला अधिकच ओहोटी लागली.

बुडत्याचा पाय खोलात जावा, तसे सन २०१९ ला घडले. प्रतीक पाटील यांचा २०१४ मध्ये साडेतीन लाखांनी झालेला पराभव म्हणजे त्यांचे सपशेल अपयश आहे आणि त्यांना पुन्हा मैदानात उतरवू नका, असाच संदेश त्यांच्या नजीकच्या लोकांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिला होता. वसंतदादा घराण्यातील उमेदवार नसेल तर मग कोण? नाव पुढे आले विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे, पण विश्‍वजित यांनी त्याला स्पष्ट नकार दिला, त्यामुळे काँग्रेसकडे लढायला चेहराच उरला नाही. नेमकी ही संधी जिल्ह्यातील काँग्रेसचे पाय खेचणाऱ्यांनी साधली आणि आघाडीच्या जागावाटपात राजू शेट्टींशी सौदा करायला, ‘बुलडाणा’ सोडायला ‘सांगली’चा वापर केला गेला.

सांगली काँग्रेसच्या हातून गेली, हे वृत्त एकूणच राजकारणात धक्कादायक होते. वसंतदादांची सांगली काँग्रेसशिवाय हा धक्का होता, आणि त्या रागातूनच संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनला कुलूप घातले होते. आज काँग्रेस ‘आम्हाला सांगली द्या’ म्हणून झोळी पसरत आहे, त्याची सुरवात पाच वर्षांपूर्वीच झाली होती. तेव्हा मी याच सदरात ‘काँग्रेसचा आत्मघात’ असे लिहिले होते, तेच आज दिसते आहे.

त्या चुकीतून काँग्रेस शिकली का, या प्रश्‍नाचे उत्तरदेखील फार समाधानकारक दिसत नाही. जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांतील काँग्रेसची कामगिरी घसरलेली आहे. जिल्हा बँक, बाजार समिती या निवडणुकांत काँग्रेस ‘मागतकरी’च्या भूमिकेत आहे. आठ मतदार संघांत दोन आमदार आहेत, मात्र सहा तालुक्यांत काँग्रेसची अवस्था बिकट आहे. ‘दिल्ली कुणाची, तर वसंतदादा घराण्याची,’ हे स्पष्ट समीकरण असताना गत पाच वर्षांत विशाल पाटील यांनी पुन्हा मतदार संघ बांधण्याचा, वसंतदादांचा जुना गट जिवंत करण्याचा, नवीन पिढीशी जोडून घेण्याचा आणि आपले राजकारण जयंत पाटील आणि कदम गटाशी संघर्षापेक्षा आपल्या उद्धारासाठी वापरण्याचा प्रयत्न केला का, याचे उत्तर त्यांनीच शोधावे.

‘विशाल हे विश्‍वासू राजकारणी नाहीत,’ असा उघड आरोप त्यांच्याच पक्षातील काही नेते वरिष्ठांसमोर सतत करतात. या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांना यावेळीही सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे, हे ठाम सांगण्यात अडचण येत आहे. विशाल पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून शड्डू ठोकून मतदार संघ पिंजून काढला असता, ठाम भूमिका मांडल्या असत्या, संदिग्धता ठेवली नसती, तर ही वेळ आली नसती. काँग्रेसला जागा सुटेल, अशी अपेक्षा नक्कीच प्रमुख नेत्यांना अद्यापही आहे. परंतु, अगदी लढाईच्या वेळेला मानसिक खच्चीकरण झाले, हे नाकारता येत नाही.

दुर्दैवी योगायोग

सन २०१४ ला काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि मदनभाऊ पाटील हयात होते. त्यानंतर काही वर्षांत त्या दोघांचेही निधन झाले आणि काँग्रेसची अवस्था अधिक बिकट होत गेली. त्याचा लाभ राष्ट्रवादीने घेतला. कुठे भाजपला हाताशी धरून, तर कुठे काँग्रेसमधील फुटीचा लाभ घेऊन आपले राजकारण विस्तारले. आता राष्ट्रवादीची स्थिती फार चांगली नाही, मात्र पतंगराव आणि मदनभाऊ असते, तर काँग्रेसवर ही वेळ आली नसती, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. जयंतरावांनी नेहमीच काँग्रेस खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. तेच आज घडते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT