राष्ट्रवादी नेत्यांकडून नेहमीच देशमुख कुटुंबावर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीत असताना पक्षासोबत राहूनही उपेक्षितच ठेवले.
आटपाडी : माणगंगा कारखाना भारतीय जनता पक्षाकडून (BJP) बळ न मिळाल्याने गेला. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी राजकीय षड्यंत्र राबविले. राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (शिंदे गट) व शेकापच्या नेत्यांनी घात केला.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अचानक अर्ज माघारी घेऊन विश्वासघात केल्याची भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख (Amarsingh Deshmukh) यांनी व्यक्त केली. माणगंगा कारखाना निवडणुकीतून (Manganga Sugar Factory Election) उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
देशमुख म्हणाले, ‘‘१९८० पासून बाबासाहेब देशमुख व गणपतराव देशमुख यांचे कारखान्याबाबत नैसर्गिक जिव्हाळ्याचे नाते होते. तेव्हापासून सांगोला तालुक्यातून गणपतराव देशमुख व आटपाडी तालुक्यातून बाबासाहेब देशमुख उमेदवारी अर्ज भरत. या वेळीही गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगोला तालुक्यातून व आम्ही आटपाडीतून अर्ज भरले.
अर्ज माघारी घेण्याच्या दोन दिवस अगोदर चर्चाही झाली. मात्र, अचानक दोनला त्यांनी अर्ज माघारी घेत असल्याचे सांगितले. अर्ज भरण्यापूर्वीच निर्णय सांगितला असता तर आम्ही सांगोल्यातून उमेदवार उभे केले असते. अचानक शेवटच्या क्षणी त्यांची भूमिका संशयास्पद असून, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेच्या दबावाखाली त्यांनी निर्णय घेतल्याचा आरोप केला. बाबासाहेब देशमुख व गणपतराव देशमुख यांच्या विचारांच्या नात्याला तिसऱ्या पिढीने तडा दिला.’’
राष्ट्रवादी नेत्यांकडून नेहमीच देशमुख कुटुंबावर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीत असताना पक्षासोबत राहूनही उपेक्षितच ठेवले. भाजपमध्ये गेल्यावरही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्यावर सूड घेण्याचे काम केल्याचा आरोप जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांनी केला.
ते म्हणाले, ‘‘विरोधकांनी कारखान्याचे खासगीकरण केले जाणार असल्याचा खोटा प्रचार केला. खरे तर जिल्हा बँकेने कारखाना विक्रीची निविदा काढली होती. आम्ही व इतर कोणीच निविदा भरली नाही. नंतर बँकेने कारखाना चालवायला देण्याची निविदा काढली. त्याची आम्ही निविदा भरली. त्यावेळीही बँकेने तीन महिने निविदा न उघडताच पैसे परत केले. बँकेतून कारखाना सुरू होणार नाही, याचे राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी षड्यंत्र रचले होते. आमदार अनिल बाबर यांची भूमिका सौम्य होती.
निवडणुकीसंदर्भात माझी व त्यांची भेट झाली. त्यांनी संस्थात्मक निवडणुका लढविणार नसल्याचे सांगितले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्षात भाग घेतला नाही.’’ श्री. देशमुख म्हणाले, ‘‘कारखाना निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालणे गरजेचे होते. हा एकट्याचा देशमुखांचा पराभव नसून, तो भाजपचाही आहे. वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले असते तर चित्र वेगळे दिसले असते. बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवली. मात्र, सभापती निवड व कारखाना निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांकडून देशमुख कुटुंबाविरुद्ध षड्यंत्र रचले गेले.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.