सोलापूर ; महापालिकेच्या सभांना सलग सहा महिन्यांपर्यंत गैरहजर राहिल्यावरून एमआयएमचे तौफिक शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. या संदर्भातील आदेशावर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वाक्षरी केल्यानंतर ते पत्र नगरसचिव कार्यालयाने रविवारी श्री.शेख यांच्या घरी पाठवले.
महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार श्री. शेख यांचे नगरसेवकपद 31 ऑक्टोबर रोजीच आपोआप रद्द झाले होते. या संदर्भात डॉ. भोसले यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच ज्येष्ठ विधिज्ञांकडूनही माहिती घेतली.
त्यानंतर नगरसेवकपद रद्द झाल्याची नोटीस बजावण्यात आली, असे नगरसचिव रऊफ बागवान यांनी "सकाळ'ला सांगितले.
तौफिक शेख हे एका खून प्रकरणात मे 2019 पासून कर्नाटकातील विजयपूरच्या कारागृहात आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत महापालिका सभा होणे व शेख यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. या कालावधीत सभाही झाली नाही आणि शेख यांना
जामीनही मिळाला नाही. त्यामुळे शेख यांचे नगरसेवकपद रद्द झाले. प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. जामीन न मिळाल्याने तीनऐवजी सहा महिन्यांची गैरहजेरी ग्राह्य धरावी, असा प्रस्ताव शेख यांनी ऑगस्ट 2019 मध्ये दिला व त्यावर सभेने निर्णय घेतला आणि तसा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार मे ते ऑक्टोबर 2019 या कालावधीसाठी सहा महिन्यांची रजा मंजूर झाली. त्याचा कालावधी संपल्याने सदस्यत्व आपोआप रद्द झाले. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूद 11 (क) नुसार "कोणत्याही कारणाने मग ते महापालिकेने मान्य केलेले असो वा नसो, लागोपाठ सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिका सभेस गैरहजर राहिला तर संबंधित नगरसेवकाचे पद आपोआप रद्द झाले असे समजण्यात येईल', अशी तरतूद आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.