Sangli Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

कॅफेत गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सांगलीत संतप्त पडसाद, 'शिवप्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांनी फोडले तीन कॅफे

सकाळ डिजिटल टीम

शंभरफुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन’ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

सांगली : विश्रामबागमधील शंभर फुटी रस्त्यावरील एका कॅफेत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकाराचे काल शहरात संतप्त पडसाद उमटले. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या (Shiv Pratishthan Yuva Hindustan) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शंभरफुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेवर (Hang On Cafe) हल्लाबोल केला. तेथील बंदिस्त खोल्या मोडून काढत साहित्याची तोडफोड केली.

त्यानंतर खरे मंगल कार्यालयाजवळील डेनिस्को आणि कॅफे सनशाईन कॅफेची तोडफोड केली. दरम्यान, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, शंभरफुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन’ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केली आहे.

याबाबत माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास ‘हॅंग ऑन’ कॅफेवर हल्लाबोल केला. जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड केली. आतील छोट्या बंदिस्त जागा, सिलिंग उचकटून टाकले. खुर्च्या बाहेर आणून तोडल्या. काचांचा चक्काचूर करून टाकला. फर्निचरसह फलक फोडून टाकला. अवघ्या काही मिनिटांत कॅफे उद्‍ध्वस्त करून टाकला. तेवढ्यात विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांची चौकशी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक परिसरात खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील कॅफेवर हल्लाबोल केला.

एकाच इमारतीमध्ये असलेल्या डेनिस्को आणि कॅफे सनशाईनमध्ये घुसून बंदिस्त जागा उद्‍ध्वस्त करून टाकल्या. फर्निचर, खुर्च्यासह साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही मुलं-मुलीही या ठिकाणी होते. बघ्यांची मोठी गर्दी परिसरात झाली होती. दरम्यान, विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तोडफोड करणाऱ्या १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

कारवाईला टाळाटाळ का?

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे रणजित चव्हाण म्हणाले, ‘‘सांगलीतील अनेक कॅफे मिनी लॉज बनले आहेत. येथे लैंगिक चाळ्यांसाठी बंदिस्त जागा दिल्या जातात. हे कॅफे बंद करण्यासाठी संघटनेने विशेष पोलिस महानिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे; परंतु पोलिस कारवाई करत नाहीत. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरू राहिल्यास तोडफोड केली जाईल.’’

कॅफेत अंधाऱ्या खोल्या, बंदिस्त जागा

कॅफेंची तोडफोड झाल्यानंतर पाहणी केली असता काही कॅफेंमध्ये एकांतासाठी अंधाऱ्या खोल्या आणि बंदिस्त जागा दिसून आल्या. विश्रामबागमधील सनसाईन कॅफेत तर धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. अन्यत्र ठिकाणी छोट्या छोट्या बंदिस्त जागा आणि काही आक्षेपार्ह गोष्टी दिसून आल्या. आता पोलिस कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष आहे.

‘सकाळ’ने उठवला आवाज

‘महाविद्यालयांना कॅफेंचा विळखा’ अशी मालिका ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. प्रत्यक्ष विविध कॅफेमध्ये चालणारे अश्‍लील चाळे समोर आले आहेत. या मीटिंग पॉईंटच्या नावाखाली तरुणाई वाम मार्गाला जात असल्याचे समोर आले. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली. कॅफेंच्या नावाखाली चालणाऱ्या अश्‍लील चाळे आणि बेकायदेशीर कृत्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली. विधानसभेपर्यंत हा प्रश्‍न नेला; परंतु कालच्या प्रकारानंतर सारेच आक्रमक झाले. संबंधित यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने कायदा हातात घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.

तोडफोडप्रकरणी गुन्हा

घटनेनंतर कॉफी शॉपमालक आशुतोष घाडगे (रामकृष्ण परमहंस सोसायटी) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित रणजित चंदन चव्हाण, रोहित रामचंद्र मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत विठ्ठल कोळी, विनायक बसाप्पा आवटी, शंकर नागराज वडर, संदीप अशोक जाधव, अर्जुन ईश्वर गेजगे, अविनाश पोपट भोसले, प्रथमेश अशोक सूर्यवंशी, योगेश बाळू गुरखा, मारुती गोविंद घुटुगडे, विलास गोपाळ पवार, सागर अनिल सूर्यवंशी, प्रदीप अधिकराव पाटील, दिगंबर मनोहर साळुंखे (रा. सांगली) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT