तंतुवाद्याची राजधानी असणाऱ्या मिरजेत सन १८५० पासून तंतुवाद्य बनवण्याची परंपरा आहे.
मिरज : वजनाला हलके पण मजबूत लाकूड; जाड साल आणि मोठ्या पोकळीचा भोपळा वापरून संगीत नगरी मिरजेतील कारागिरांकडून बनवल्या जाणाऱ्या सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन (G. I.) मिळाले आहे. तंतुवाद्य निर्मितीतील वैशिष्ट्य व गुणवत्ता या जोरावर हे यश मिळाले असून, संगीतनगरीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार विभागांतर्गत भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे हे मानांकन मिळाले आहे. तानपुरा वाद्यास (Tanpura instrument) जीआय मानांकनासाठी सोलटून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संगीतवाद्य निर्मिती कंपनीने, तर सतार वाद्यासाठी (Sitar Instrument) मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर संस्थेने (Miraj Musical Instrument Clusters Institute) प्रस्ताव सादर केला होता.
त्या दोन्ही प्रस्तावांना मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे प्रमुख मोहसीन मिरजकर, मुबीन मिरजकर यांनी आज दिली. त्यामुळे जगभरातील संगीतक्षेत्रात मिरजेच्या तंतुवाद्यांचे मोल वाढणार आहे. श्रवणीय सुरावटींवर भौगोलिक मानांकनाची छाप उमटल्याने मिरज शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होणार आहे. तंतुवाद्य निर्यात आणि संगीतनगरी म्हणून मिरजेला पर्यटनाच्या नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे, असा विश्वास मिरजकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘‘या वाद्यांना जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे देश-विदेशांत वेगळी ओळख मिळाली आहे. तंतुवाद्याची राजधानी असणाऱ्या मिरजेत सन १८५० पासून तंतुवाद्य बनवण्याची परंपरा आहे. तंतुवाद्य निर्मिती करणाऱ्या कुटुंबियांच्या सहा-सात पिढ्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविना, सूरबहार यांसारखी वाद्ये बनवित आहेत. मिरजेतील वाद्यांना देशभरात आणि विदेशांतही मागणी आहे.
सतार व तानपुरा वाद्यास जीआय मानांकन मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या वाद्यांना मागणी वाढणार आहे. जीआय मानांकन मिळविण्यासाठी नाबार्ड, आरओ पुणे, हस्तकला विभाग कोल्हापूर, उद्योग विभाग सांगली व पद्मश्री डॉ. रजनीकांत यांच्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्याला यश मिळाले.’’ यावेळी बाळासाहेब मिरजकर, संचालक अल्ताफ पिरजादे, फारुक सतारमेकर, नासीर मुल्ला, रियाज सतारमेकर प्रमुख उपस्थित होते.
मिरजेत बनवले जाणारे तंतुवाद्याला जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडसह अमेरिका, जपान, इंडोनेशिया, मलेशिया आदी देशांत तंतुवाद्यांची मागणी सर्वाधिक आहे. मिरज शहरात २५ कुटुंबे या तंतुवाद्य निर्मितीत आहेत. २५० कारागीर काम करतात. २० केंद्रांवर तंतुवाद्य विक्री केली जाते.
स्थानिक बाजारपेठेत मिळणारे लाकूड आणि सांगोला, बेगमपूर, मंगळवेढा भागात खास वाद्यनिर्मितीसाठी पिकविला जाणारा जाड सालीचा भोपळा हे भौगोलिक वैशिष्ट्य ठरले आहे. तंतुवाद्यावर केली जाणार कलाकुसर आणि नादमधुरता यासाठी केली जाणारी जव्हारी ही खासियत आहे. लाकूड आणि भोपळा हे भौगोलिक वैशिष्ट्य आणि अव्दितीय कलाकुसरीमुळे मिळालेला सर्वोत्तम दर्जा यामुळे वाद्यांना जागतिक मान्यता मिळाली होतीच, त्यावर आता जी.आय.ची मोहोर उमटली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.