विटा - दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने नारळ सोलण्याची लोखंडी मशिन डोक्यात मारून भावाचा खून केल्याची घटना बलवडी (भा.) (ता. खानापूर) येथे काल रात्री नऊच्या सुमारास घडली. वैभव अर्जुन पवार (वय ३८) असे मृताचे नाव असून विनोद अर्जुन पवार (वय २४) असे संशयिताचे नाव आहे. विनोदला ताब्यात घेऊन अटक केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. अलका अर्जुन पवार यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले, की बलवडी येथील वेताळबा वस्ती येथे पवार कुटुंब राहते. काल (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास वैभव व विनोद यांच्यात बाचाबाची झाली. वैभवने दारूच्या नशेत विनोदला शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून विनोदने वैभवच्या डोक्यात नारळ सोलण्याचे मशिन दोन-तीन वेळा मारून गंभीर जखमी केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच अवस्थेत त्याने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेले. तेथे वैभवला चक्कर आल्याने दगडावर पडून डोके आपटले.
त्यामुळे तो जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगून विनोद दिशाभूल करत होता. पोलिसांना संशय आल्याने बलवडी येथे घटनास्थळी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. त्याची आई अलका यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता अलका व त्यांच्या सात वर्षांच्या नातवाने विनोदने नारळ सोलण्याच्या लोखंडी मशिनने वैभवच्या डोक्यात मारल्याचे सांगितले. संशयित विनोदला ताब्यात घेऊन अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस उपाधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. निरीक्षक संतोष डोकेंसह सहायक निरीक्षक प्रशांत चव्हाण, दत्तात्रय कोळेकर, पांडुरंग कन्हरे, मोहन चव्हाण, पुंडलिक कुंभार, अक्षय जगदाळे, मारुती गायकवाड, अरविंद संकपाळ यांनी हा तपास केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.