सांगली : चंद्रकांत पाटील यांना आता चिंता पडली आहे की आपला पक्ष कसा टिकवायचा. त्यामुळे ते वारेमाप बोलत आहेत. पुण्यातील एका महिलेने चांगले काम करून तयार केलेल्या मतदार संघात ताबा घेऊन तिथून निवडणूक लढवली, हा काय पुरुषार्थ आहे? त्यामुळे शरद पवार यांची त्यांनी मापे काढूच नयेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दित चकमक सुरु आहे. शरद पवार यांनी पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांच्याबाबत "ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्या बद्दल मी काय भाष्य करू' असे त्यांनी म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना "पवारांनी माढा का लढला आणि पुन्हा लढता लढता का सोडला', असा टोला लगावला होता. "पवारांनी मला शिकवू नये', अशा शब्दात टीका केली होती. त्याबाबत जयंतरावांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली.
महिलेच्या जीवावर भाजपाने लोकप्रियता मिळवली.
जयंत पाटील म्हणाले, "कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी अतिशय कष्टाने हा मतदार संघ बांधला होता. एका महिलेच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणे हा काय पुरुषार्थ आहे का? मेधा कुलकर्णी यांना बाजूला ढकलून चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा वापर करत तेथून निवडणूक लढवली. स्वतःच्या मतदार संघ आणि जिल्हा सोडून दुसऱ्या महिलेच्या मतदारसंघात जावे लागते. महिलेच्या जीवावर भाजपाने लोकप्रियता मिळवली. "आयत्या बिळावर नागोबा' अशी चंद्रकांत पाटलांची वर्तणूक राहिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची मापे काढणे बंद करावेत. आपण विरोधी पक्षात आहोत, जे काही असेल ते रीतसर बोलायला आमची हरकत नाही. उगाच वारेमाप बोलू नये.
सत्तेसाठी भाजपा खालच्या थराला
गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत जयंत पाटील म्हणाले, "राज्यात आज भाजपा कोणत्या थराला गेली आहे ते कळत आहे. सत्ता गेल्यानंतर भाजपाची मानसिक स्थिती कशी आहे, हे त्यांच्या नेत्यांच्या विधानावरून जनतेला कळते आहे. कोणाची योग्यता किती ते सगळ्यांनाच माहीत आहे. आज सत्तेसाठी भाजपा खालच्या थराला जाऊन काहीही बोलत आहे. त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही.''
संजयकाकांचे माहिती नाही.
भाजपच्या समारंभांना अनुपस्थितीत राहणारे खासदार संजय पाटील हे तुम्ही जेथे असता तेथे कसे हजर रहात आहेत, काय विशेष? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अतिशय शांतपणे "मला त्याची माहिती नाही', असे सांगून उत्तर देणे टाळले. संजय पाटील यांनीही "मॉडेल स्कूल' कार्यक्रमाच्या भाषणात "माझ्या हजेरीचा वेगळा अर्थ काढू नका', अशी पत्रकारांना विनंती केली होती.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.