शिवरायांनी बालवयात जिथं स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराला पोहोचण्यासाठी एका परदेशी भटक्याने वाई जवळील धोम धरणाच्या जलाशयात उडी घेतली. आणि पोहतच तो गेला. याचा सोशल मीडियावर व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. पीटर व्हॅन गेट असं त्या बेल्जीयमवासी 47 वर्षीय तरुणाचं नाव. या अवलियाला नुकतेच पुण्यात भेटता आले आणि त्याचे उलगडलेले अंतरंग.
पीटर यांना लहानपणापासूनच भटकंतीची आवड. साधेपणा मुळचाच. सायकलिंग, रनिंग, स्विमिंग व मैदानी खेळाची आवड. सिस्को कंपनी मार्फत ते भारतात आले आणि त्यांना भारताची भुरळच पडली. मग त्याने कंपनीशी बोलून चेन्नईतच नोकरी मिळवली. आणि त्यांची भारतातील भटकंती सुरू झाली. अनोखा एकटा प्रवास सुरू केला. मात्र त्यांना खरी भुरळ पडली ती महाराष्ट्राची, इथल्या संस्कृतीची आणि शिवरायांच्या सह्याद्रीची. शिवचरित्राच्या, सह्याद्रीच्या ते अक्षरशः प्रेमात पडले.
सह्याद्रीच्या कुशीतील किल्ले, अथांग-बेलाग डोंगररांगा, तिथले इतिहासाचे अवशेष वास्तू, हे सारं फिरण्यासाठी त्यांनी 60 दिवसांत तब्बल 200 गडकिल्ल्यांना भेटीचे "मिशन ट्रान्स सह्याद्री 2019' सुरू केले आणि पूर्णही केले.
हे पण वाचा - त्या मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात
त्यासाठी या परिसराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून टप्पे ठरवले. लोणावळा ते नाणेघाट, हरिश्चंद्रगड ते भंडारदरा, माथेरान ट्रॅव्हर्स, पुणे ते महाबळेश्वर असा गडकिल्ल्यांचा परिसर त्यांनी पिंजून काढला. मिळेल त्या वाहनांनी, वेळप्रसंगी चालत-पळत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. दुर्गम भागात स्वतःचे वाहन हवे म्हणून त्यांनी जुनी दुचाकी घेतली. त्यानंतर नाशिक उत्तर, अंजठा-सातमाळा रांग, नाशिक उत्तर, सॅलबेरी-डॉलबेरी रांग, नाशिक पश्चिम, त्रिंम्बक रांग, नाशिक दक्षिण, कळसुबाई रांग, हरिश्चंद्रगड विभाग, पवना-ताम्हिणी विभाग, मुंबई दक्षिण विभाग, मुंबई उत्तर विभाग, कोकण दक्षिण विभाग सातारा विभाग असा दुसरा टप्पा पूर्ण केला.
या मोहिमेसाठी भौगोलिक अभ्यास, जीपीएस प्रणालीचा योग्य वापर, शास्त्रशुद्ध मोहिमेची आखणी केली. कमीत कमी सामान, सोबत छोटा तंबू, मॅट, बॅग, डोक्यावर टोपी, अंगावर एक टीशर्ट-चड्डी, सॉक्स-शूज, मोजके फोटो काढण्यासाठी एक मोबाईल फोन, चार्जर इतकंच सोबत सामान. पूर्ण मोहिमेदरम्यान त्यांनी बाटलीबंद पाणी घेतलं नाही. गावकरी देतील ते जेवण. अन्यथा केवळ पाण्यावर दिवसभर भटकंती. दिवसात चार ते पाच किल्ले असा त्यांचा दिनक्रम होता. रात्र झाली की मिळेल तिथं तंबू लावायचा, गावातील मंडळींशी हातवारे करून संवाद साधायचा, गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेला पाहुणचार स्वीकारायचा. जेथे जेवण केले त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा. पुन्हा पुढची वाट. सूर्योदयाची किरणे नेहमीच डोंगराच्या माथ्यावर त्यांनी घेतली. जंगलातील मुक्कामाची भीती वाटली नाही का या प्रश्नावर ते म्हणाले,""वन्यजीवांना आपल्यापासून अधिक धोका आहे. खरे तर माणसासारखा हिंस्र प्राणी कोणताच नाही. त्यामुळे वन्यजीव आपल्याजवळ यायला घाबरतात. आपणही त्यांच्या वाट्याला जायचे नाही. कारण आपण त्यांच्या घरात आलोय, ते आपल्याकडे आले नाहीत.''
मोहिमेदरम्यान ते मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा ठिकाणीच राहिले. आता हा अष्टपैलू अवलिया मराठी शिकतोय-बोलतोय, महाराष्ट्रात शहरोशहरी जाऊन सह्याद्री व गडकिल्ले यावर सादरीकरण देतोय. अनेकांना तो शिवरायांचे गडकोट किल्ले फिरण्यासाठी प्रेरणा देतोय. त्याचं एकचं सांगणं आहे... "Die with memories; not with dream"
समीर शेख, (अध्यक्ष, निसर्गप्रेमी दुर्गसंवर्धन संस्था)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.