धनंजय दौंडे, सकाळ वृत्तसेवा
कुंडल (सांगली) : विश्वास घातकी राजकारणामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत किरण लाड (Kiran Lad) यांचा पराभव झाला असा आरोप आमदार अरुण अण्णा लाड (Arun Lad) यांनी केला. असल्या कुजक्या, नासक्या राजकारण करणाऱ्या बरोबर न जाता येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची विनंती पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार असल्याचेही लाड यांनी सांगितले. कुंडल येथे पलूस व कडेगाव तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार लाड बोलत होते. यावेळी किरण लाड,जिल्हा परिषद गटनेते शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
आमदार लाड म्हणाले, किरण लाड यांचा पराभव राहूल महाडिक यांच्या उमेदवारी मुळे झाला नसून विश्वासघातकी नासक्या, कुचक्या राजकारणामुळे झाला. जिल्हा बँकेच्या या बँका , पतसंस्था गटात महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चांगली स्थीती होती. या गटात राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाची प्राबल्य आहे. पुणे पदवीधर निवडणूक प्रमाणेच या निवडणूकीत कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागले होते. किरण लाड यांची उमेदवारी व चिञ फारच चांगले होते यश मिळणार याची खात्री कार्यकर्त्यांना होती. या निवडणुकीत कार्यकर्ते, नेते कुठेही कमी पडले नाहीत. मात्र सहकारी उमेदवाराकडून विश्वास घातकी राजकारण केले गेले. मला कार्यकर्ते म्हणतात, अण्णा तुम्ही समाजकारण जास्त करता राजकारणात कमी पडता. पण आम्ही राजकारण करायला कमी पडतोय म्हणून आम्हाला अपयश आले असे नाही, तर पाटील यांच्या चालबाज राजकारणाने आमचा पराभव झाला आहे.
क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या आदर्श विचारांच्या वाटेने आम्ही जाणारी शक्ती आहे. असे सडके राजकारण करायची वृत्ती आमच्या रक्तात नाही. विधानसभेला जी.डी. बापूंनी डाॕ. पतंगराव कदम, संपतराव देशमुख ,पृथ्वीराज बाबा देशमुख यांना पाठिंबा दिला होता. त्यांना पाठबळ देऊन निवडूनही आणले होते. मात्र गद्दारी किंवा विश्वासघातकी राजकारण आम्ही कधी केले नाही. या निवडणुकीत आमच्या शक्तीने कुठेही सिंगल मत मागितले नाही पण किरण लाड पुढे जातायत असे वाटल्याने त्यांनी आपली स्वतःची मते बदलली. कारण महाडीक यांना मागे घ्यायचे त्यांच्या हातात नव्हते माञ आमच्या उमेदवाराला मागे घ्यायचे त्यांच्या हातात होते.
पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना , घटकपक्षांची मते घेतली माञ आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सांगली, मिरज,जत येथील मते दिली नाहीत त्यांच्या हक्काची मते किरण लाड यांना न देता राहूल महाडिक यांच्याकडे वळवली . फक्त 30 मते त्यांनी महाडिक यांच्याकडे न वळवता लाड यांना दिली असती तर दोन्ही उमेदवार विजयी झाले असते. मात्र त्यांनी तिथेच घोटाळा केला. त्यांचे राजकारण उघड उघड झाले आहे. कारण मतदान वेगवेगळे तालुका निहाय समजल्याने त्यांनी केलेली फसवणूक लक्षात आली.
ते म्हणाले , वाईट काम त्यांनी केले माञ स्वबळावर लढूया अशा सारख्या आरोळ्या देतात. असल्या कुजक्या राजकारण करणाऱ्यांच्या बरोबर न जाता येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवूया अशी विनंती पालकमंञी जयंत पाटील यांना करणार आहे.
यावेळी किरण लाड म्हणाले , ही निवडणूक आपण सगळ्यानी ताकतीने लढविली. पराभवाने खचून न जाता अरूण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची मजबूत बांधणी करूया. यावेळी जि.प.सदस्य नितीन नवले, अरूण पवार, प्रा.प्रताप लाड, अनिल लाड वसंत लाड, कुंडलीक एडके,अनंत जोशी , श्रीकांत लाड, दादा पाटील, दिनकर लाड, धर्मवीर गायकवाड, रणजीत लाड, गोविंद डुबल, विनायक महाडीक, दिपक मदने, जयदीप यादव, पांडुरंग संकपाळ, रणजीत लाड, माणिक गोतपागर आदि उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.