पलूस (जि. सांगली) ः गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका द्राक्षबागायतदारांना बसला. आता याही वर्षी काही प्रमाणात असणारे कोरोनाचे सावट आणि सततचे ढगाळ वातावरण याचा गैरफायदा घेत व्यापारी व दलाल यांनी अत्यंत कमी दरात द्राक्ष खरेदी सुरू करून द्राक्षबागायतदारांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे याही वर्षी द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे.
पलूस तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी बागायतदारांनी मेहनत करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले. द्राक्षाला चांगला दर मिळून आर्थिक फायदा होईल, अशी आशा होती. मात्र, झाले उलटच. अचानक सर्व जगभर कोरोने थैमान घातले. मार्चमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. द्राक्षबागायतदारांचे आशेवर अक्षरशः पाणी फिरले.
बाजारपेठा बंद असल्याने अगदी कवडीमोल भावाने द्राक्ष विक्री झाली. व्यापारी व दलाल यांनी कवडीमोल दराने द्राक्ष खरेदी केली. शिवाय खरेदी केलेल्या मालाचे पैसेही काही बागायतदारांना मिळाले नाहीत. काही बागायतदारांनी नाईलाजाने बेदाणे बनवले. एकंदरीत गेल्या वर्षी द्राक्षबागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. निदान यावर्षी तरी द्राक्षाला अपेक्षित दर मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र, याही वर्षी जवळपास तशीच परिस्थिती आहे. सर्वत्र कोरोनाचे संकट आहेच. शिवाय अधूनमधून ढगाळ वातावरण आणि पाऊस पडत आहे. तसेच बाजारपेठेत द्राक्षाला दर नाही. अशी कारणे सांगून व्यापारी व दलाल यांनी कमी दरात द्राक्षाची खरेदी सुरू करून बागायतदारांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. द्राक्षाला सरासरी चारकिलोस 120 ते 150 रुपये पर्यंत भाव देण्यात येत आहे. तर पुणे, मुंबई व इतर ठिकाणी ग्राहक मात्र ग्राहकांना तिप्पट, पाचपट दराने द्राक्ष विक्री केली जात आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.