Police Diary Crime News : जिगरी दोस्त. त्याला विश्वासात घेऊन प्रथम गोळी झाडली. नंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी नेऊन पेटवला. तेथील राख पोत्यात भरून कृष्णा नदीत (Krishna River) फेकली. तोच मित्र बेपत्ता असल्याचे भासवून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमवेत पायपीट करण्याचे नाटकही केले. काळ उलटला... खुनाची योजना फत्ते झाली. मात्र जिगरी दोस्ताच्या यारीने झोपच उडविल्याने बडबड वाढली आणि खुनाला वाचा फुटली. सुतावरून स्वर्ग गाठणे, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारे काम पोलिसांनी केले आणि खुनातील संशयितांना शिक्षा झाली.
सांगली पोलिसांच्या (Sangli Police) कामगिरीला उंचीवर नेऊन ठेवणारे हे खून प्रकरण सांगलीतलेच. सन २०१६ मधील ही घटना. मिंच्याचा खून खूप चर्चेत आलेला. कोणी केला, याचाच सुगावाच नव्हता. पोलिसांनी पुन्हा-पुन्हा ‘त्या’ नापीक आणि दुर्लक्षित शेतातील जळीत जागेवरच्या उरल्या-सुरल्या राखमिश्रित मातीची चाळण करणे सुरू ठेवले. एके दिवशी चाळणीत एक दात (Teeth) हाताला लागला. त्या दाताला होती कॅप. त्या कॅपवर काहीतरी क्रमांक असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी निःश्वास टाकला.
तपासाला गती आली... मृताची ओळख पटली आणि मग खुन्याच्या मागावर पोलिस निघाले. शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद. मात्र तपास दिला स्थानिक गुन्हे अन्वेषणला. तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बिरोबा नरळे आणि पथकाकडे तपासाची सूत्रे आली. पहिल्यांदा दोस्तांचीच यादी काढली. कोण, कोणाशी कितीवेळा बोलले, त्यांच्यापैकी मृताच्या संपर्कात कोण कितीवेळा आले, त्यांचे अखेरचे लोकेशन कुठे आणि किती वाजता होते, मृत व्यक्ती कधीपासून बेपत्ता होता, या संपूर्ण घटनाक्रमांचे धागे जुळवून पोलिसांनी खुनाला वाचा फोडली.
गुन्ह्यातील खुनी हे त्याचे जिगरी मित्रच. काही नाजूक कारणातून राग मनात होता. घटनेदिवशी मिंच्याला बोलावून घेतले. कवठेपिरानजवळ गोळी झाडली. त्याच मित्रांनी शेतात नेऊन मृतदेह जाळला आणि बेपत्ता असल्याचा बनाव केल्याचे संशयितांनी कबूल केले. केवळ घटनास्थळी मिळालेल्या दातावरून पोलिसांनी घटनेच्या कड्या जुळवत खुनाचा उलगडा केला. त्यापैकी एकास सक्तमजुरीची शिक्षा झाली. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळेच या गुन्ह्याचा छडा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.