सांगली : राज्यातील महाआघाडी आणि भाजपच्या नेत्यांमधील संघर्षाचे पडसाद आता जिल्हा बॅंक निवडणुकीत दिसतील असे चित्र आहे. अशी लढत करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटीलच फारसे इच्छुक नाहीत कारण त्यांचे जिल्ह्यातील काही भाजप नेत्यांशी असलेले पूर्वापार सख्य. त्यामुळे ते या धर्मसंकटातून स्वतःची कशी सुटका करतात हे येत्या आठवडाभरातच स्पष्ट होईल. ही लढाई झाली तरी लढत लुटुपुटुची की खरी असा प्रश्न उपस्थित होणारच आहे.
सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात राज्यभर सत्तासंघर्ष पेटला आहे. एकमेकांवर टीकेच्या फैरी सुरू आहेत. कार्यकर्ते समाजमाध्यमांवरून खुन्नस देत आहेत. मात्र जिल्ह्यातील नेतेमंडळी मात्र फारसे एकमेकाला अंगावर न घेता कला कलाने राजकारण करताना दिसतात. मात्र आता निवडणूकच असल्याने लुटुपुटुची का असेना लढाईची भाषा करावी लागत आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व जयंतरावांकडे आहे. राज्यात सत्ता बदलली तरी इथे सर्वपक्षीय ‘कारभार’ सुरूच होता. आता ही निवडणूक बिनविरोध करून बॅंकेवरील पकड मजबूत करण्याच्या ते तयारीत होते. त्यासाठी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही बनवला होता. मात्र आता राज्यातील वातावरण चिघळल्याने इथे काय करावे असा त्यांच्यासमोर पेच आहे.
नेहमीप्रमाणे ‘आर्थिक संस्थेत राजकारण नको’ अशी ढाल पुढे करीत हा संघर्ष टाळण्याचा त्यांचा पवित्रा होता. इथली बीजेपी नेहमीच जयंत जनता पार्टी म्हणजेच जेजेपी असायची. मात्र आता भाजप खासदार संजय पाटील यांनीच म्हटल्याप्रमाणे ते मैत्रीपूर्ण संबंध विसरून बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करावा लागेल, असे स्पष्ट संकेत आहेत. जयंतराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या धोरणाचाच भाग असणार आहे. राज्यभर स्वतंत्रपणे पक्ष वाढीसाठी ते दौरे करीत आहेत. त्यामुळे इथेही त्यांना भाजप नेत्यांसोबतचे सख्य विसरून लढावे लागेल, असे संकेत आहेत.
हा पेच जसा जयंतरावांसमोर आहे तसाच इथल्या भाजप नेत्यांसमोरही आहे. त्यांना शीर्ष नेतृत्वाचा आदेश शिरसावंद्य मानून महाविकास आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मौनात असलेल्या नेत्यांना येत्या आठवडाभरात वाचा फुटण्याची शक्यता आहे. अर्थात ते एकमेकांची उणीदुणी कशी काढणार हा पेच आहेच कारण जे काही झाले आहे त्याची सामूहिक जबाबदारी सर्वांवरच आहे. त्यामुळे दिवाळीचे फटाके आणि फुसके आपटबार फुटतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.