स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचे राजकारण सहकाराभोवती फिरत राहिले. मात्र सहकार आणि राजकारणात सूक्ष्म अशी फारकत असली पाहिजे, या विचाराने जिल्हा बँकेचे राजकारण दीर्घकाळ हाताळले गेले. विशेषतः १९८० च्या दशकापर्यंत तरी अर्थकारणात राजकीय हस्तक्षेप कमीत कमी राहिला पाहिजे, असाच विचार जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळींचा असायचा. तसे स्वातंत्र्य बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळाला असायचे.
बँकेच्याच या प्रदीर्घ कालखंडावरच नव्हे, तर राज्याच्या सहकार क्षेत्रावरही सहकार प्रबोधनकार गुलाबराव पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकपणा येण्यासाठी सहकारात प्रशिक्षित मनुष्यबळ आले पाहिजे यासाठी सहकार प्रशिक्षण केंद्र स्थापनेत पुढाकार घेतला. सांगली जिल्हा बँकेत घडलेल्या या नेतृत्वाने राज्याच्या सहकाराला दिशा दिली.
१९६० ला राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राची वाटचाल कृषी-औद्योगिक अशी एकत्रितरीत्या असेल, असा इरादा व्यक्त करीत, या दोन्ही क्षेत्रांत सहकार असेल आणि त्यात सरकार आपली भागीदारी करेल, असा ‘रोडमॅप’च पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडला. त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील एक नेतृत्व म्हणजे गुलाबराव पाटील होते. वसंतदादांना सांगलीच्या राजकारणात मदत व्हावी म्हणून सातारच्या न्यायालयात वकिली करणाऱ्या गुलाबरावांना सांगलीत जाण्याचा आदेशच यशवंतरावजींनी दिला.
पुढे, वसंतदादा आणि गुलाबराव या जोडीने जणू सांगली जिल्ह्याच्या सहकाराचा पायाच घातला. १९५५ च्या पहिल्या संचालक मंडळात उपाध्यक्ष म्हणून सहभागी झालेले गुलाबराव पुढे सुमारे तीन दशके बँकेच्या कारभारात राहिले. याच कालखंडात जिल्ह्यातील साखर कारखानदारी विस्तारली. सिंचन योजना सुरू झाल्या. जवळपास चौदा वर्षे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी खेडोपाड्यापर्यंत बँकेचा पतपुरवठा विस्तारण्यासाठी सायकल खरेदी, शेळ्या-मेंढ्या खरेदीपासून द्राक्षबागांसाठी पतपुरवठा करण्यापर्यंतची धोरणे त्यांनी राबवली.
या साऱ्या कालखंडात बाजीराव बाळाजी पाटील, जोतिरामदादा पाटील-सावर्डेकर, यशवंत भीमराव घोरपडे, एस. डी. पाटील, रूस्तमराव देशमुख, महादेव गोडबोले, केशवराव चौगुले, आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, मोहनराव पाटील, बाळासाहेब वग्याणी, बाळासाहेब गुरव, दादासाहेब पाटील, बापूसाहेब पुजारी अशा सहकारातील वारकऱ्यांनी शेकडो ही चळवळ पुढे नेली. ही काही वानगीदाखल नावे आहेत. सहकाराच्या या प्रवाहात अनेकांचे योगदान आहे. ते शब्दबद्ध करण्याची गरज आहे.
ही सारीच मंडळी राजकारण-समाजकारणात स्वतंत्रपणे कार्यरत होती. काँग्रेसमधील विविध मतप्रवाहांचे प्रतिनिधित्व करीत. मात्र बँकेत आपापल्या विचारांचे जोडे बाहेर काढूनच येत होते. त्या काळात बहुतेक जिल्हा कोरडवाहू होता. खेडोपाड्यात विकासाच्या संधी पोहोचल्या नव्हत्या. मात्र शेतकऱ्यांच्या छपरात प्रगतीचा दिवा लावण्याच्या इराद्याने त्या काळात जे काही प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांची मशाल जिल्हा बँकेने तोलली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आज मागे वळून बघताना गेल्या साठ वर्षांत सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्राने जिल्ह्याचे अर्थकारण उभे केले, असे म्हणावे लागेल. सहकारी बँका, सोसायट्या आणि पतसंस्थांचे जाळे उभे राहिले. त्यातून पतपुरवठ्याचे सूक्ष्म जाळे तयार झाले आहे. मध्यंतरी सहकारी पतसंस्था आणि बँकांपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे राहिले. या वादळातही या संस्था टिकून राहिल्या. त्यांनी सहकार टिकवून ठेवला आणि जोमाने वाटचाल करीत आहे. सहकारी संस्थांमधील संचालक विश्वस्त आहेत. सहकाराच्या विचारांचा हा गाभा आहे. समाजातील तळागाळातील माणूस हाच सहकाराच्या केंद्रस्थानी असला पाहिजे.
आज खेडोपाड्यात उभ्या राहिलेल्या पतसंस्थाचे महत्त्व आजही अबाधितच आहे. भाजीपाला विक्रेता ते लघुउद्योजकांपर्यंतच्या घटकांना कर्जपुरवठा करणाऱ्या पतसंस्था मोठे अर्थकारण सांभाळत आहेत. या पतसंस्थांमध्ये ठेवींच्या रुपाने, दैनंदिन बचतीच्या रुपाने बचतीचा संस्कार करीत आहेत. घरोघरी जाऊन प्रतिनिधी अत्याधुनिक ॲपद्वारे पिग्मी गोळा करीत आहेत. या पतसंस्था, सोसायट्यांच्या रुपाने हळदी-कुंकू समारंभापासून मोठमोठे सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. त्यातून सांस्कृतिक चळवळीची जपणूक होत आहे. विविध क्रिडा स्पर्धा, होतकरु विद्यार्थ्याना या संस्थांचा मदतीचा हात मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.