‘आलमट्टी’च्या बॅकवॉटरची फूग कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, तेरवाड, इचलकरंजी, रुई बंधाऱ्यांपर्यंत स्पष्टपणे दिसत आहे.
सांगली : कर्नाटकमधील आलमट्टी धरणात (Almatti Dam) पंधरा दिवसांपासून केंद्रीय जल आयोगाच्या (Central Water Commission) नियमांचे उल्लंघन करून पाणीसाठा सुरू आहे. महापूर नियंत्रण कृती समिती याबाबत सातत्याने सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सावध करीत होती. मात्र, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘आलमट्टी’तील विसर्ग वाढवण्याबाबत गांभीर्याने प्रयत्न न झाल्याचा फटका आता शिरोळ तालुक्याला बसताना दिसत आहे.
गेल्या १५ जुलैला पाणीसाठा ९७.४२ टीएमसी झाला आहे. पाण्याची तेव्हा आवक ४३ हजार ५७८ क्युसेक होती. केंद्रीय जल आयोगाने ऑक्टोबर २०१८ मध्ये निश्चित केलेल्या धरण पाणीसाठ्याचा नियमावलीला कर्नाटकने धाब्यावर बसवले आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार पाणी पातळी ५१३.६० मीटर इतकीच हवी, जी सध्या ५१७.९८७ मीटर आहे. ३१ जुलैअखेर क्षमतेच्या पन्नास म्हणजे सुमारे ६२ टीएमसीइतकाच पाणीसाठा असायला हवा. आज ८८ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ३१ जुलैपर्यंत पन्नास टक्के हवे ते आजच जवळपास ७१ टक्के भरले आहे. आजघडीला आलमट्टी ते हिप्परगी बॅरेजमध्येही अडीच टीएमसी पाणी साठवले आहे. २० जुलैपासून (ता. २०) कृष्णा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज होता. तो खरा ठरला आहे. हा धोका आणखी असताना केलेली ही घाई सांगली-कोल्हापूर जिल्ह्यासाठी धोका ठरण्याचीच शक्यता आहे.
पाऊसमानाचा इतिहास सांगतो, की महाराष्ट्रातून म्हणजे राजापूर बंधाऱ्यातून प्रतिवर्षी ३१ ऑगस्टपर्यंत ७००, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत ३०० टीएमसी पाणी वाहून जाते. एवढा प्रचंड विसर्ग महाराष्ट्रातून होत असताना कर्नाटक मात्र सातत्याने विषाची परीक्षा घेत आहे. कर्नाटकने सातत्याने पाणी अडवून ठेवले आहे. अगदी सांगली-कोल्हापूरला पाऊस नसतानाही ‘आलमट्टी’त ७८ हजार क्युसेक पाणी रोज साठत होते. आज ‘आलमट्टी’च्या पाणीसाठ्याचा सध्याच्या मुसळधार पावसात स्पष्ट परिणाम सध्या शिरोळ तालुक्यात दिसत आहे. अगदी नृसिंहवाडीपर्यंत पाण्याची फूग आहे. खरे तर आपल्या जलतज्ज्ञांनी या सर्व परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून राज्य शासनापुढे ठोस अहवाल मांडायला हवा.
‘आलमट्टी’च्या बॅकवॉटरची फूग कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, तेरवाड, इचलकरंजी, रुई बंधाऱ्यांपर्यंत स्पष्टपणे दिसत आहे. या भागात सध्या पाणी स्थिर किंवा मंद गतीने पुढे सरकते आहे. सांगली जिल्ह्यातही अंकली-हरिपूर पुलापर्यंत पाण्याची ही फूग दिसत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ऐनवेळी ‘आलमट्टी’तून विसर्ग वाढवणे अवघड होऊ शकते. तेव्हा, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय जल आयोगाच्या धरण वेळापत्रकाच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटकवर आग्रहपूर्वक दबाव आणला पाहिजे, अशी महापूर नियंत्रण कृती समितीची सातत्याने मागणी आहे.
‘आलमट्टी’तील पाणीसाठा नियम डावलून आहे. फुगवट्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. २००५ पूर्वी असं पाणी ८-१५ दिवस कधीच साठून राहिलं नव्हतं, हे आधीच्या प्रत्येक पिढीतील माणूस सांगेल. २००५ पासूनच हे संकट सुरू झाले आहे. त्याला आलमट्टीचा पाणीसाठा बऱ्याचअंशी जबाबदार आहे. आम्ही तेव्हा कर्नाटक शासनाला कृष्णा नदीच्या दोन्ही तिरावरून (महाराष्ट्र व कर्नाटक अभियंत्यांच्या टीमने) संयुक्तपणे पाहणी दौरा करूया, अशी विनंती केली होती. मात्र त्यांनी ती अमान्य केली. याचाच अर्थ कर्नाटकने नदी तळतलांक, सील लेव्हल ॲडजेस्ट केली आहे. या माझ्या म्हणण्याला दुजोरा मिळतो. जगातील कोणताही अभियंता सध्याच्या जाहीर पातळ्यांवर ग्राफिकली १०० टक्के फुगीचा परिणाम सिद्ध करू शकत नाही. एक-दीड मीटरने केलेली ॲडजस्टमेंट परिणामकारक असू शकते हे महाराष्ट्राने ध्यानात घेतले पाहिजे.
-दिनकर पाटील, निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग
साडेतीन लाख क्युसेकने ‘आलमट्टी’ने विसर्ग केला पाहिजे हे आम्ही गेले आठ दिवस सातत्याने सांगत आहोत. तुलनेने सांगलीची परिस्थिती सध्या बरी आहे. कोयना धरणातून पाणी विसर्ग वाढवण्याची घाई तूर्त करू नये. कारण सध्या चांदोली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाचा विसर्ग सुरू आहे. कोयनेतून शनिवारनंतरच विसर्ग वाढवावा.
-प्रभाकर केंगार, विजयकुमार दिवाण निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग
९ जुलै ५१५.८५ व ७१.३९ ७८६६८ व ५०
२५ जुलै ५१७.९८ व ८६.८४ १ लाख ९८ हजार ३३० व
२ लाख ७५ हजार ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.