Jayant Patil son Prateek Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil: पुत्राची उमेदवारी अन् जयंतरावांची कसोटी; टप्प्यात करणार 'कार्यक्रम'? प्रतीकचा 'पार्थ पवार' होऊ नये म्हणून खबरदारी!

महाविकास आघाडीतून या दोन्ही ठिकाणी विजयाची गणितं जमवणं सोपं नाही, याची पक्की जाणीव जयंतरावांना आहे.

अजित झळके

घरच्या हातकणंगले मतदार संघात जयंतरावांना बेरीज तुलनेत अधिक सोपी असेल. महाविकास आघाडीकडून प्रतीक लढले तर राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने (किंवा पर्यायी उमेदवार) विरुद्ध प्रतीक अशी तिरंगी लढत होईल.

सांगली : संकट काळात खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ देत असलेल्या आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मुलगा प्रतीक पाटील (Pratik Patil) याचं राजकीय लाँचिंग हा मोठा पेच दिसू लागला आहे. हातकणंगले आणि सांगली या दोन लोकसभा मतदार संघांतून प्रतीकसाठी चाचपणी केल्याचं त्यांनी सांगितलं. यापैकी सांगलीची जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला गेली आहे. हातकणंगलेत राजू शेट्टींशी (Raju Shetti) महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत.

अशावेळी जयंतरावांनी (Jayant Patil) भाजपमध्ये यावं, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांचा हात सोडून मुलासाठी भाजपचं तोरण बांधायचं की महाविकास आघाडीत राहून दोनपैकी एक पर्याय रेटायचा, याचा निर्णय जयंतरावांना करायचा आहे. तो करताना प्रतीकचा ‘पार्थ पवार’ होऊ नये, याची खबरदारी ते घेतील. कारण, महाविकास आघाडीतून या दोन्ही ठिकाणी विजयाची गणितं जमवणं सोपं नाही, याची पक्की जाणीव जयंतरावांना आहे.

परंतु, शरद पवारांना या काळात सोडून जाणं, हे त्यांच्या ‘इमेज’ला धक्का देणारं ठरेल, याचीही त्यांना कल्पना आहे. शरद पवार यांनी राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयंतराव रडल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिले होते. त्यामुळे जयंतरावांची अभूतपूर्व कोंडी झाल्याचे चित्र समोर येत आहे.

जयंतराव महाविकास आघाडीतच राहिले आणि प्रतीक यांना सांगलीतून लढवायचे ठरवले तर लढाई सोपी नसेल. पहिले आव्हान असेल काँग्रेसकडून जागा राष्ट्रवादीकडे घेण्याचे. ते करताना वसंतदादा घराण्यावर अन्यायाचा मुद्दा अडचणीचा ठरेल. जयंतरावांची सांगली शहरातील मजबूत फळी अजितदादा गटाकडे सरकली आहे. मोजके सोबत आहेत.

मिरजेत तीच अवस्था आहे. भाजपकडून खासदार संजय पाटील उमेदवार असतील, तर ‘तासगाव-कवठेमहांकाळ’मधून मतदान खेचणे सोपे नसेल. आबा गट किती प्रामाणिक मदत करेल, याविषयी शंका आहेच. ‘खानापूर-आटपाडी’त राष्ट्रवादीची ताकद ‘उणी’ झाली आहे. अशा वेळी जयंतरावांना आमदार विश्‍वजित कदम यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. पलूस, कडेगाव, जत तालुक्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त ताकद त्यांना मिळू शकते. संजयकाकांवर नाराज भाजप नेते अप्रत्यक्ष मदत करतील, अशी मांडणी होऊ शकते.

अर्थात, भाजपच्या महाशक्तीच्या रेट्यापुढे कुणी वळवळ करेल का, हेही चाचपून पाहावे लागेल. जयंतरावांनी अनेकांचा, अनेकदा ‘कार्यक्रम’ केला आहे. त्यामुळे जयंतराव टप्प्यात आल्यावर उलटा कार्यक्रम करण्याची संधी काहीजण शोधू शकतील. जयंतरावांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रतीकना सांगलीची भाजपची उमेदवारी मिळवली, तर गणित पूर्ण बदलेल. वसंतदादांचा नातू विरुद्ध राजारामबापूंचा नातू, अशी ऐतिहासिक लढत होईल. पूर्वीची ‘जेजेपी’, जयंतरावांच्या मदतीने निवडून आलेले भाजपचे नेते परतफेड करतील, अशी मांडणी होऊ शकते.

भाजपच्या बहुतांश नेत्यांना इच्छा असो वा नसो, जयंतरावांचे काम करावे लागेल. विरुद्ध बाजूला काँग्रेस आणि विशाल पाटील यांच्याबद्दलची सहानभूती वाढू शकते. विशाल अधिक आक्रमकपणे मैदानात दिसू शकतील. दादा-बापू जुना वाद उघड आणि आक्रमकपणे प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अशा वेळी विश्‍वजित कदम यांची कोंडी होऊ शकते. त्यांनी विशाल यांना ताकद दिली नाही तर जयंतरावांचे जिल्ह्यावर एकहाती प्रभुत्व निर्माण होऊ शकते.

भविष्यात ते पलूस-कडेगाव आणि जत मतदार संघात विश्‍वजित यांना त्रासाचे ठरू शकते. अर्थात, जयंतरावांनी ‘पर्याय दोन’ विचारात नाही, असे जाहीर केले आहे. शिवाय, अमित शहांशी घनिष्ठ संबंध असलेल्या खासदार संजयकाकांची उमेदवारी कापली जाईल का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

हातकणंगलेत ‘बेरीज’ होईल?

घरच्या हातकणंगले मतदार संघात जयंतरावांना बेरीज तुलनेत अधिक सोपी असेल. महाविकास आघाडीकडून प्रतीक लढले तर राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने (किंवा पर्यायी उमेदवार) विरुद्ध प्रतीक अशी तिरंगी लढत होईल. त्यात जातीय समीकरणांसह कारखानदार विरुद्ध शेतकरी नेता, अशा लढ्याची शक्यता अधिक आहे. हातकणंगले मतदार संघातून प्रतीक भाजपचे उमेदवार झाले आणि शेट्टींशी थेट सामना होईल. अशा स्थितीत आखाड्यातून बाहेर पडावे लागणारे खासदार धैर्यशील माने, पॅड बांधून बसलेले राहुल आवाडे यांचे काय, हा प्रश्‍न उरतो. अर्थात, युतीत ‘आमचं काय’ असे विचारण्याची मुभा मिळेल का, हा प्रश्‍न आहे. टप्प्यात आल्यावर ‘कार्यक्रम’ करण्याची आवड असणारे जयंतराव कोणता टप्पा निवडतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT