देशाचे वातावरण झपाट्याने बदलत आहे. कर्नाटकात जनशक्तीने भाजपला हादरा दिला. तिथे स्थिर आणि गतीमान सरकार आले.
सांगली : काँग्रेस (Congress) सामान्य माणसाशी नाळ सांगणारा पक्ष आहे. आमचं राजकारण 'बेस टू बेस' आहे. वसंतदादांची सांगली काँग्रेसकडंच चांगली राहील. त्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची जोडी झपाटून काम करेल, ती बिनतोड ठरेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संजयनगर येथील काँग्रेस मेळावा व आरोग्यवर्धिणी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
व्यासपीठावर आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, कांचन कांबळे, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक मनोज सरगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, शुभांगी साळुंखे, संजय मेंढे, मदिना बारुदवाले, प्रशांत मजलेकर, युवा नेते जितेश कदम आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत सातत्याने काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या भागात नगरसेवकांनी शक्तीप्रदर्शन केले. अशोक चव्हाण म्हणाले, "देशाचे वातावरण झपाट्याने बदलत आहे. कर्नाटकात जनशक्तीने भाजपला हादरा दिला. तिथे स्थिर आणि गतीमान सरकार आले. महाराष्ट्रात मात्र स्पष्ट बहुमत असताना तोडफोड केली जातेय. शिंदेंना फोडले, अजित पवारांना पळवले. आत्मविश्वास हरवलेले हे सरकार आहे.
आज मनपाची सत्ता संपली, पुन्हा कधी निवडणुका होतील माहित नाही. लोकशाहीचा गळा घोटला जातोय. आमचं राजकारण असं नाही. आम्ही भाजपच्या तोंडाला फेस आणू. सांगलीत विश्वजीत, विशाल, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांचा भक्कम एकजुटीला साथ द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
विश्वजीत कदम म्हणाले, "गेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने नाविलाजाने मित्रपक्षासोबत आघाडी केली, मात्र आम्ही फसलो गेलो. त्याची किंमत मोजावी लागली. संजयनगरने मात्र स्पष्ट साथ दिली. विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. भाजपच्या भूलथापांना आता लोक फसणार नाहीत. धनगर समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर आता स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. सांगली लोकसभा काँग्रेसच लढेल आणि तुम्ही पूर्ण शक्तीने साथ द्या."
विशाल पाटील म्हणाले, "जाती- धर्मात भांडण लावून जिंकणे एवढाच भाजपचा कार्यक्रम आहे. सांगली तीस वर्षे भाजप जिंकत आली आहे, मात्र विकास कुठे झाला? मोदी मोठं बोलून गेले, पण सांगलीत त्यांच्या सरकारचे योगदान काय? धनगर आरक्षणावर फडणवीसांचे प्रतिज्ञापत्र वाचा, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आता काँग्रेस थांबणार नाही. राष्ट्रवादीचा उर्वरीत गट फुटला तरी आम्ही ७५ नगरसेवक निवडून आणू एवढी ताकद इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांत आहे."
पृथ्वीराज पाटील म्हणाले, "महापालिकेप्रमाणे लोकसभा व विधानसभेला येथून काँग्रेसला ताकद मिळायला हवी. आम्ही एकसंघ आहोत, जनताच आम्हाला वेगळे होऊ देणार नाही.” जयश्री पाटील म्हणाल्या, "काँग्रेसचा हा बालेकिल्ला असाच मजबूत ठेवा. लोकसभा, विधानसभेलाही अशीच ताकद द्या.
मनोज सरगर आणि संजय कांबळे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा समाचार घेतला. मोदींचा फोटो का लावला नाही म्हणून अकांडतांडव करणाऱ्यांनी हे आरोग्य केंद्र कोणत्या सरकारने, कोणत्या फंडातून मंजूर झालेय याची माहिती घ्यावी. आदळ-आपट करण्यापेक्षा मैदानात येऊन लढा, असे आव्हान दिले.
विशाल पाटील यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, “दहा वर्षे खासदार राहिलेल्या नेत्याने या भागासाठी एक रुपयाचा निधी दिला नाही. भूलथापा देण्यापलीकडे त्यांनी काही काम केले नाही. त्यांच्या हाताला पुन्हा लोकसभा लागणार नाही, हे त्यांना कळून चुकले आहे. गेल्या निवडणुकीत हात चिन्ह असते तर वेगळे चित्र असते, यावेळी ते दिसेल.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.