इस्लामपूर : ‘नगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलेले भाडे आम्हाला मान्य आहे; परंतु जीएसटी आणि अनामत रक्कम आम्ही देणार नाही,’ या व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेसमोर इस्लामपूर नगरपालिका प्रशासन नमले. याप्रकरणी माघार घेत प्रशासनाने जीएसटीसह १५०० रुपये भाडे, या मागणीला मान्यता दिली. त्यानंतरच दुपारी दीडला लिलावाला सुरवात झाली.
संभूआप्पा मठाच्या परिसरात व्यापाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जागेवर प्रशासनामार्फत आज सकाळी लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती; मात्र व्यापाऱ्यांनी २०६५ रुपये भाड्याला आक्रमकपणे विरोध केला. ‘आम्हाला हे भाडे मान्य नाही. कोरोनाच्या संकटकाळात व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. प्रशासनाने आहे हेच भाडे न घेता व्यापाऱ्यांना मोफत जागा द्यावी, त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसूल करू नये,’ अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली. मात्र प्रशासन लिलाव आणि २०६५ रुपये भाड्यावर ठाम होते. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला, घोषणाबाजी केली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते शहाजी पाटील, भाजपचे नेते विक्रम पाटील, काँग्रेसचे नेते विजय पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव साबळे सांगलीत असल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी नसले, तरी काही अधिकारी प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. हे अधिकारी आणि व्यापारी यांच्यात बराच खल झाला. त्यानंतर शहाजी पाटील, विक्रम पाटील, विजय पवार व व्यापारी प्रतिनिधी या सर्वांनी एकमत करून प्रशासनाशी संवाद साधला. या संवादानंतर प्रशासनाकडून जीएसटीसह १५०० रुपये भाडे या मागणीला मान्यता देण्यात आली. याशिवाय शहरातील बहुतांश व्यापारी व काही व्यापारी हे बाहेरच्या भागातील असल्याने अनामत रकमेसाठी त्यांना नंतर घालावे लागणारे हेलपाटे विचारात घेता पूर्णतः अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय नगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
दुसऱ्यांना जागा देणाऱ्यांवर कारवाई होणार?
गेली अनेक वर्षे त्याच त्या व्यापाऱ्यांना जागा दिल्या जात आहेत. यातील काही लोकांनी स्वतःच्या नावावर जागा घेऊन इतरांना ज्यादा दराने त्या दिल्याने प्रशासनाने लिलावाचा आग्रह धरला होता. परंतु व्यापाऱ्यांनी संघटितपणे हा आग्रह मोडीत काढला. व्यापाऱ्यांना ज्यादा दराने जागा देणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी कुजबुज घटनास्थळी होती. प्रशासन यावर काही कारवाई करणार का, याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.