sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : वाळलेली झाडं पडून गंभीर अपघातांची मालिका सुरुच! पण पालिका म्हणते

धोकादायक म्‍हणून कत्तल नको

राजेश नागरे

सांगली : शहरात वाळलेली झाडे नागरिकांच्या जीवावर उठली असताना हिरवीगार, जुनी झाडेही पडत आहेत, तोडली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच येथील काँग्रेस भवन परिसरात भलेमोठे झाड उन्मळून एस.टी.वर पडले. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा धोकादायक झाडांची टांगती तलवार असताना प्रशासनाकडून मात्र ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. अचानक झाडे उन्मळण्याच्या घटनांमध्ये का वाढ झाली? त्याचा तपास करण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली जात नाही.

झाड पडल्यानंतर लाकडे उचलण्यापलीकडे प्रशासनाकडून काहीही घडत नाही, हेही दुर्दैव. म्हणून शहरातील धोकादायक झाडांची टांगती तलवार कोणाच्या मानेवर कधी पडेल, सांगता येत नाही. त्‍याच वेळी धोकादायक झाडे हटवताना वृक्ष समितीसमोर चर्चाकरुनच नियमांची अंमलबजावणी व्‍हावी.

दहा वर्षांपूर्वी बसवर तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

२०१२ मधील मार्च महिन्यात सांगली-मिरज रस्त्यावर एका नामांकित शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर भलेमोठे झाड कोसळले होते. त्यात तिघा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. हृदय पिळवटणाऱ्या या घटनेनंतर अनेक चौकशा झाल्या, त्याचे पुढे काय झाले, हा संशोधनाचा विषय आहे. तर यंदा एप्रिल-मे महिन्यांत शहरात झालेल्या दमदार पावसामुळे मार्केट यार्ड, स्टेशन रस्ता, विश्रामबाग, सावळी रस्ता, यशवंतनगर, खणभाग, जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर, शंभर फुटी रस्ता, वखार भाग म्हणजे शहरातील जवळपास सर्वच प्रमुख मार्गांवर झाडे उन्मळून पडली.

तीसवर धोकादायक झाडे काढली

मॉन्सूनपूर्व मोहिमेचा भाग म्हणून शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती काढावीत, असा संकेत आहे. परंतु तसे दरवर्षी होताना दिसत नाही. वृक्ष समितीच्या अहवालानुसार शहरात यंदा तीसवर धोकादायक झाडे काढण्यात आली आहेत. साडेतीनशेहून अधिक फांद्या कापण्यात आल्या. गुलमोहर कॉलनीसह परिसरातील धोकादायक झाडे काढण्याचे काम सुरू आहे, असे पालिकेचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या वृक्ष गणनेत आतापर्यंत २ लाख ७४ हजार ५५१ झाडे नोंदवण्यात आलीत. त्यांचे वय व जातीनुसार वर्गीकरण करण्यात येत आहे.

नियम काय सांगतो...?

राज्य शासनाच्या २००९ च्या नियमानुसार व उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक तथा रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष हटविण्यासाठी नियम दिले आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने सर्वेक्षण करून वृक्ष हटविण्याची नोटीस प्रसिद्ध करावी, नागरिकांच्या हरकती मागवून निर्णय घ्यावा, एका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष लावणेही सक्तीचे आहे. खासगी जागामालकासह पालिकेलाही स्वत:ची जागा असल्यास पाच वृक्ष लावण्याची नवीन जागा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

...हे वृक्ष धोकादायक

शहरात झाडे लावताना स्थानिक झाडांऐवजी परदेशी झाडे लावल्याने वृक्ष पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात मुख्यत: गुलमोहर, रेन ट्री, निलगिरी यांचा समावेश आहे. विदेशी वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. फांद्यांचा डोलारा मोठा असला तरी त्यांचे खोडही मजबूत नसते. नव्वद टक्के घटनांत विदेशी वृक्ष पडल्याचे पाहायला मिळते. विदेशी वृक्षांमुळे स्थानिक जैवविविधता धोक्यात येत आहे, असे वृक्ष समितीचे सदस्य राजा देसाई यांनी सांगितले.

...यामुळे झाडे होतात कुमकुवत

रस्त्यांवर झाडांच्या कडेने काही प्रमाणात तरी मोकळी जमीन सोडणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात झाडाच्या अगदी जवळूनच डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाते. परिणामी, झाडे कमकुवत होतात. रस्ते रुंद करताना किंवा पदपथ करताना अनेक झाडांची मुळे तोडली जातात. खोडाच्या आसपास माती ठेवली जात नाही. त्यामुळेही झाडे धोकादायक बनतात.

...समतोल ढासळल्याने घटना

देशी वृक्षांत वडाची झाडे, फांद्या पडल्याचे पाहायला मिळते. कारण झाडांच्या खोडाच्या बाजूने खणणे, त्यांच्या मुळ्या काढणे, रस्त्यावर येतात म्हणून एकाच बाजूच्या फांद्या तोडणे असे प्रकार सर्रास होतात. त्याचा परिणाम म्हणून झाडांचा समतोल ढळतो आणि ती सहजपणे कोसळतात. तसेच झाडाच्या मुळाशी कचरा जाळण्याचे किंवा आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र यामुळे झाडाची मुळे जळतात. झाडातील सजीवपणा नष्ट होऊन ते आपोआप वाळतात आणि अशी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

शहरातील धोकादायक झाडांबाबत बैठकीत अहवाल देण्यात येतो. त्यानुसार ती काढण्यात येतात. मात्र झाडे उन्मळून पडण्याची विविध कारणे आहेत. त्यावर ठोस उपाययोजनांची गरज आहे. तसेच झाड तोडण्यासाठी परवानगी देताना घेतल्या जाणाऱ्या अनामत रकमेचे अधिकार हे वृक्ष समितीला देण्यात यावेत, जेणेकरून वृक्षसंवर्धनासह अशा घटना रोखण्यास मदत होईल.

- राजा देसाई, सदस्य वृक्ष समिती, महापालिका.

शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. झाड पडल्यानंतर फक्त लाकूड गोळा करण्यासाठीच पालिका आहे का? महापालिकेची वृक्ष समिती करते काय?

-सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT