Sangli Police Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police : निर्जन नागज घाटात मृतदेह जाळून टाकला, पण डिझेलच्या कॅनवरून 'त्या' खुनाचा छडा लागला

पोलिसांनी अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या गुन्ह्याचा आठवड्यातच छडा लावत संशयितांना गजाआड केले.

शैलेश पेटकर

Sangli Police : कोणताही गुन्हा घडला की, आरोपीला आपण मांजरासारखे डोळे मिटून दूध पितो, असं वाटत असतं; मात्र पोलिस (Police) त्याच्याही चार पावले पुढे जाऊन गुन्‍ह्याचा तपास लावत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. सुमारे शंभर किलोमीटरवरून एक मृतदेह नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील निर्जन घाटात आणून जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींना वाटले, आपण पोलिसांची दिशाभूल केली. आता आपण सहीसलामत सुटलो; मात्र या गुन्ह्याचा छडा लावण्यात साधा डिझेलचा (Diesel) कॅन कारणीभूत ठरला आणि एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल चार संशयितांना गजाआड करण्यात यश आले.

या वर्षातीलच ही खुनाची घटना आहे. नागज घाटात एकाचा मृतदेह जाळून टाकल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अजूनही मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत होता; मात्र त्याची ओळख पटत नव्हती. मृतदेहाची ओळख पटवण्यापासूनच्या कड्या पोलिसांना जुळवाव्या लागणार होत्या. अत्यंत क्लिष्ट असणारा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे (LCB Inspector Satish Shinde) यांचे एक पथक तपसात होते. घटनास्थळी सारी पाहणी झाली. त्या ठिकाणी डिझेलचा एक नळ असलेला कॅन दिसून आला.

एकच पुरावा पोलिसांच्या हाती लागला. मग असे कॅन कोठे असतात, कोठे अधिक वापर केला जातो, याची चाचपणी केली गेली. त्या वेळी शंभर किलोमीटरवरील विजापूर येथे अशा कॅनचा सर्वाधिक वापर असल्याचे पोलिसांना कळाले. सहायक निरीक्षक पंकज पवार, अंमलदार बिरोबा नरळे, दरिबा बंडगर, सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर यांचे पथक विजापूरला गेले. तेथील पोलिस ठाण्यात कोणी बेपत्ता आहे का, याची तपासणी केली. खुनाच्या घटनेला आता चार दिवस उलटले होते, तोवर कोळेकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

त्या वेळी एक आलिशान मोटार त्यांना दिसून आली. त्या मोटारीच्या चाकातील हवा पाहिल्यानंतर काही वजनदार वस्तू त्यात असावी, असा संशय आला आणि ती मोटारही विजापूरचीच निघाली. दोन कड्या पोलिसांना मिळाल्या होत्या. चौथ्या दिवशी विजापूर पोलिस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने दिली. तिला मृतदेह दाखवला; मात्र ओळख पटली नाही. अखेर पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.

मृत व्यक्ती ही विजापूरमधील एका मित्राकडे सेंट्रिंगच्या कामाला होती. तिचा पैशांच्या देवाणघेवाणीतून वादही यापूर्वी झाला होता. इतकी माहिती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी मृताच्या मित्राला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे चौकशी केली. त्याचे आणि मृताच्या पत्नीचे नाजूक संबंध असल्याचे समोर आले. त्या मित्राने हा डोईजड झाल्याने त्याचा काटा काढण्याचे नियोजन केले. याची सुपारी नातेवाइकांना दिली होती. प्रथम विजापूरमध्ये त्या मृताला खीर खाऊ घातली. नंतर एका ठिकाणी त्याला नेऊन तेथे त्याचा गळा आवळला.

चाकूने भोसकले आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा मुख्य संशयिताला मृतदेह दाखवला. त्यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाट निवडला; मात्र घाबरलेल्या त्या तरुणांनी नागज येथे हा मृतदेह जाळला. पहाटेची वेळ आणि लोक दिसू लागल्याने अर्धवट जळालेला मृतदेह सोडून संशयितांनी पळ काढला. पोलिसांनी अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या गुन्ह्याचा आठवड्यातच छडा लावत संशयितांना गजाआड केले. पोलिसांच्या कामगिरीचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT