'आमदार सुमन पाटील (Suman Patil) या पुत्रप्रेमात आंधळ्या झाल्या आहेत. त्यांना आपल्या युवा नेता सुपुत्राच्या भवितव्याची चिंता वाटते आहे.'
सांगली : गेली ४५ वर्षे ज्यांच्या घरात सत्ता आहे, त्यांनी सावळजसह आठ गावांच्या पाण्यासाठी उपोषण करण्याचा इशारा द्यावा, ही त्यांची आगतिकता आहे. आमदार सुमन पाटील (Suman Patil) या पुत्रप्रेमात आंधळ्या झाल्या आहेत. त्यांना आपल्या युवा नेता सुपुत्राच्या भवितव्याची चिंता वाटते आहे, अशी टीका खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी पत्रकार परिषदेत केली.
असले प्रकार थांबले नाहीत तर आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या काळातील भाषणे, घोषणा, आश्वासनांची जंत्री बाहेर काढावी लागेल. त्यांनी लोकांनी कसे भुलवले, याचा हिशेब मांडावा लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. प्रभाकर पाटील ॲक्टिव्ह झाल्याने आपल्या मुलाचा राजकारणात निभाव लागेल का, या चिंतेने आमदारांना ग्रासले आहे, असा टोला लगावला.
संजय पाटील म्हणाले, ‘‘टेंभू योजनेतून आठ गावांसाठी पाणी द्यावे, यासाठी उपोषण म्हणजे आबा कुटुंबाच्या ४५ वर्षांच्या अपयशाची कबुली आहे. येत्या दोन महिन्यात विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. या गावांना पाणी येणार आहे. त्यासाठी चार-पाच वर्षे सातत्याने प्रयत्न करतो आहे. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत ज्या सावळज परिसराच्या जीवावर मजल मारली, त्या गावांना हक्काचे पाणी देता आले नाही.
वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेशासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आणली आहे. हे सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी व राजकीय स्टंटबाजी सुरू आहे. २०१३ ला पडलेल्या जीवघेण्या दुष्काळात त्रस्त शेतकऱ्यांनी मांजर्डे येथे दुष्काळी पाणी परिषद घेतली. या परिषदेमुळे पराभव दिसू लागल्याने विसापूर-पुणदी योजना करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी याच योजनेमधून सावळजसह आठ वंचित गावांना पाणी देण्याची फसवी घोषणा केली.''
बॅनरबाजी, पेपरबाजी केली. तासगाव तालुक्याचा कॅलिफोर्निया करण्याची बतावणी केली. पुणदी उपसा सिंचन योजनेतून सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीन वेळा भरणार असल्याची लबाड घोषणा केली होती. तोच वारसा आता चालवला जात आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर, खजिनदार राहूल सकळे, युवा नेते प्रभाकर पाटील उपस्थित होते.
काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यावर खासदार पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘मी जिल्ह्यात जेवढा फिरलोय, त्या तुलनेत विशाल दहा टक्के तरी लोकांच्या संपर्कात आहेत का? कुणाला तरी नेता करून नौका पार करू पाहात आहेत. त्यांची प्रवृत्ती, वागणूक पाहून त्यांची पात्रता ठरेल.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.