एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर राज्य सरकारने खासगी गाड्यांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लालपरी डेपोत तर खासगी गाड्या फलाटावर असे चित्र बस स्थानकांमध्ये दिसत आहे.
एसटी आगाराचा ताबा घेतला खासगी गाड्यांनी पोलिस बंदोबस्तात प्रवासी वाहतूक सुरू...फलाटावर लागल्या काळी-पिवळी टॅक्सी, जीप सांगली- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध आगारांचे बसस्थानक काही दिवसापासून ओस पडले आहेत. गृह विभाग (परिवहन) ने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून खासगी प्रवासी बसेस, स्कूल बस, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सांगलीत आज खासगी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी आदी गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला. एसटीच्या फलाटावर काळी-पिवळी जीप लागल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसून आले.
एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यात गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कृती समितीने देखील संपात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीचे चाक जागेवरच थांबले आहे. सांगली जिल्ह्यात ४ हजार ७०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. दैनंदिन १३६६ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची आणि नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.
दरम्यान, गृह विभाग (परिवहन) यांनी अधिसूचना काढून मोटार वाहन अधिनियमातील कलमानुसार खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आदी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. आदेशानुसार आज सकाळपासून सांगलीतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या फलाटावर ३५ काळी-पिवळी टॅक्सी लावण्यात आल्या आहेत. पोलिस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दूरवरच्या प्रवासासाठी बसेसही दाखल झाल्या आहेत.
सांगलीतून जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. कोल्हापूर, सातारा, पुणेसह प्रमुख मार्गावर या गाड्या उपलब्ध होतील त्याप्रमाणे सुरू केल्या जातील. सांगलीसह विविध आगारात या खासगी गाड्या तैनात केल्या आहेत. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दोन दिवसापूर्वी खासगी तत्वावरील शिवशाही गाड्या भाजपने अडवल्या होत्या. त्यामुळे या खासगी गाड्या अडवल्या जाऊ नयेत म्हणून सांगलीत पोलिस बंदोबस्तात या गाड्या रवाना केल्या जात आहेत. जिल्ह्यात एकूण एक हजार च्या वर काळे पिवळे टॅक्सी आहेत त्या सर्व आले आहेत
खासगी वाहतूक आगारातून सुरु असताना शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत बंदोबस्त ठेवला आहे. तसेच आरटीओ उपनिरीक्षक प्रशांत इंगवले, किरण धुमाळ, गजानन कोळी, अश्विनी चव्हाण, नेहा विधाते, नंदा बारकोटे आदींसह काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मजगे व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.