Sangli Tasgaon independence day 
पश्चिम महाराष्ट्र

तासगावात तिरंगा फडकला; प्रतिसरकारचा रचला पाया!

सांगलीची स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपाने

सकाळ वृत्तसेवा

३ सप्टेंबर १९४२ हा दिवस तासगावच्या इतिहासातले ‘सुवर्णपान’ आहे. तासगावचा मोर्चा म्हणून त्याची इतिहासात नोंद आहे, ज्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने निघालेल्या या मोर्चाने प्रतिसरकारचा पाया घातला. या प्रतिसरकारचे केंद्र होते तासगाव शहर आणि कुंडल होते प्रशिक्षण केंद्र. या मोर्चात इंग्रजांच्या सेवेतील मामलेदार आणि न्यायाधीशांना गांधी टोपी घालून भारतीय तिरंग्याला वंदन करण्यासाठी भाग पाडण्यात आले. या मोर्चाची साक्ष देत आजही तहसील कार्यालयाची जुनी वास्तू उभी आहे. समोरच स्मृतिस्तंभ आहे. त्यावर कारावास भोगलेल्या ५१ स्वातंत्र्यसैनिकांची नावे कोरली आहेत. समस्त तासगावकरांचे ते ‘तीर्थस्थळ’ आहे.

- प्रा. बाबूराव गुरव

मुंबईत ८-९ ऑगस्ट, १९४२ या दोन दिवसांच्या गवालिया टँक येथील काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ब्रिटीश राजसत्तेला ‘चालते व्हा’, असा इशारा दिला आणि तिथून देशभर ही चळवळ फोफावली. ‘करा किंवा मरा’ हा त्यांचा भारतीय जनतेला आदेश होता. काँग्रेसच्या बड्या नेत्यांची धरपकड सुरू झाली आणि सामान्य तरुणांच्या हाती लढ्याची सूत्रे आली. त्या साखळीतील एक कडी म्हणजे तासगावचा मोर्चा ठरला. पश्‍चिम महाराष्ट्रात ‘चले जाव’ चळवळीचा आदेश म्हणून कऱ्हाडमध्ये पहिला, पाटणमध्ये दुसरा आणि तिसरा मोर्चा तासगाव येथे निघाला.

३ सप्टेंबर, १९४२ हा तो दिवस. या मोर्चाआधी क्रांतिसिंहांनी, ‘वसगडे येथील चावडीवर येत्या ३ सप्टेंबरला हल्ला करणार आहोत,’ अशी नोटीस लावली. जिल्हा कलेक्टरांनी हा हल्ला परतवून लावण्याचे फर्मान काढले. त्यानुसार पोलिसांची मोठी कुमक एक दिवस आधीच संपूर्ण चावडीला संरक्षक कडे घालण्यासाठी रवाना झाली. इकडे, मोर्चाच्या तयारीसाठी क्रांतिसिंहांनी तासगाव पंचक्रोशीत मोठे जागरण सुरू ठेवले होते. मोर्चादिवशी चोहोबाजूच्या गावागावांतून स्वातंत्र्यसैनिकांचे जथ्थे तासगावच्या दिशेने धडक देत येत होते. ही सारी माणसे तासगावच्या पश्‍चिम बाजूला एकत्र आली.

तेथे मोर्चेकऱ्यांच्या स्वागतासाठी गुळाच्या ढेपा, शेंगाच्या पाट्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ठेवल्या होत्या. गर्दीसमोर क्रांतिसिंहांचे घणाघाती भाषण झाले. सभेत वि. स. पागे यांनी तासगावात जाताना मोर्चा निःशस्त्र असावा, असा विचार मांडला. मात्र मोर्चेकरी शस्त्रसज्ज होते. शेवटी नाना पाटील म्हणाले, ‘‘मर्दाला मिशी... तसं चळवळीला हत्यार असलंच पाहिजे.’’ क्रांतिसिंहांच्या विचाराला हत्यारे उंचावत गर्दीने संमती दिली आणि काठ्या-कुऱ्हाडी, भाल्यांसह मोर्चा तासगावातील जोतिबा मंदिरापासून सुरू झाला.

मोर्चात कुंडलहून जी. डी. बापू, पलूसहून आदम पैलवान, हणमंतवडीयेहून भगवानबप्पा मोरे, कवठेएकंदमधून दादा भोकरे, ज्ञानूबुवा गुरव, पद्माळे येथून वसंतदादा पाटील, कुपवाडमधून धोंडिरामबापू माळी, वाळव्यातून नागनाथअण्णा नायकवडी अशी नेतेमंडळी शस्त्रसज्ज होऊनच आली होती; तर खुद्द तासगावात भाई गणपतराव कोळी, सदाशिव कराडे यांनी मोर्चेबांधणी केली होती. चांगला हजार-दीड हजारांचा हा मोठा मोर्चा होता.

महात्मा गांधी-भारतमातेचा जयघोष करीत मोर्चा तासगावात घुसला. पोलिस हतबल झाले होते. आधी गुरुवार पेठेत न्यायालयाकडे मोर्चा वळवला. जमावाने त्या वेळेचे न्यायाधीस एच. एस. पाटील यांना बाहेर बोलावून त्यांना गांधी टोपी घातली. त्यांना मोर्चात सहभागी करीत मोर्चा मामलेदार कचेरीवर गेला. तिथे मामलेदार एल. टी. निकम यांनाही गांधी टोपी घातली आणि त्यांच्यासमोरच ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा’ फडकावण्यात आला.

त्या वेळी मामलेदार कचेरीच्या तटावर उभे राहून कुंडलच्या मामासाहेब पवार यांनी राष्ट्रगीत म्हटले. धोंडिरामबापूंनी सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यातील कोठडीतील कैदी, स्वातंत्र्यसैनिकांना मुक्त केले. मोर्चा कमालीचा यशस्वी झाला. मामलेदार आणि न्यायाधीशांना गांधी टोपीसह ध्वजवंदन करायला भाग पाडल्याने हा मोर्चा देशभर गाजला. ब्रिटीश राजसत्ता कोलमडली आहे, हे बिंबवणारा हा मोर्चा ठरला.

खुद्द क्रांतिसिंह मोर्चाची तयारी करून भूमिगत झाले. मोर्चातून परत जातानाही गावोगाव सरकारी कार्यालये, चावड्यांवर हल्ले झाले. निमणी, पानमळेवाडी येथील सरकारी विश्रामगृहे पेटवून देण्यात आली. नागनाथअण्णांनी बांबवड्याचा डाक बंगला फोडला. ब्रिटिशांची देशभर नाचक्की झाली. ‘तासगाव मोर्चा’पासून प्रेरणा घेत इस्लामपूर, वडूजला मोर्चे निघाले.

इस्ला‍मपूरच्या मोर्चात पोलिसांच्या गोळीबारात विष्णू बारपट्टे, पंड्या इंजिनिअर हुतात्मा झाले. वडुजच्या मोर्चात नऊ हुतात्मे झाले आणि महाडमध्ये भाई कोतवाल हुतात्मा झाले. त्यानंतर सशस्त्र पोलिसांसमोर निःशस्त्र माणसे उभी करायची नाहीत, असा निर्धार झाला आणि शांततामय मोर्चा पर्व संपून प्रतिसरकारच्या लढ्याला प्रारंभ झाला. तिथून स्वातंत्र्य मिळेपर्यंत सांगली-सातारा जिल्ह्यावर प्रतिसरकारचा वचक राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT