ढेबेवाडी (जि.सातारा) : वादळात घरावरील पत्र्याचे छप्पर धडधड आवाज करायला लागल्यावर दोघी मायलेकी जीव मुठीत धरून आणि एकमेकींना आधार देत घरातीलच सुरक्षित वाटणाऱ्या खोलीत गेल्या. तिथे पोचताच अचानक डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळले. मग, मात्र क्षणाचाही विलंब न करता वृद्ध आईला उचलून धाडसी लेक पुन्हा स्वयंपाक घरात धावली. लाकडे-विटा अंगावर, पायावर कोसळत असतानाही तिने सुरक्षित ठिकाणी घेतलेली ही धाव काळालाही मागे सरकायला लावणारी ठरली. मानेगाव (ता. पाटण) येथे घडलेला जीवन-मृत्यूचा हा थरारक पाठलाग त्या दोघींच्या तोंडून ऐकताना सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शनिवारी सायंकाळी या परिसरात वादळी पाऊस झाला. मानेगाव, काढणे व तारुख परिसरात वादळाचा जोर जास्त होता. तेथील अनेक घरांवरील पत्रे वादळात उडाले. मानेगाव येथील भगवान पांडुरंग माने यांच्या घरात वास्तव्याला असलेल्या त्यांच्या वृद्ध आई व बहिणीला तर "काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती,' याचीच प्रचिती यानिमित्ताने आली. भगवान माने व त्यांचे कुटुंबिय मुंबईस राहण्यास असतात. गावाकडे त्यांचे मोठे घर असून तेथे त्यांची आई श्रीमती यशोदा पांडुरंग माने (वय 85) आणि बहीण श्रीमती कांता नामदेव सावंत (वय 62) राहतात. श्रीमती यशोदा यांना मणक्याच्या दुखण्यामुळे चालता येत नाही. वळिवाच्या पावसाला सुरवात झाली तेव्हा दोघी मायलेकी घरात होत्या. वादळाने घरावरील पत्र्याचे छप्पर धडधड वाजायला लागल्यावर घाबरलेल्या कांताने आईला आधार देत घरात मध्यभागी असलेल्या खोलीत आणले. मात्र, त्याचक्षणी वादळाच्या तडाख्याने घरावरील छप्पर उडून दूरवर शेतात पडल्याचा आवाज कानावर येण्यास आणि डोळ्यासमोरच निम्मे घर कोसळण्यास एकच गाठ पडली. मग, मात्र दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत वृद्ध आईला उचलून घेऊन ही धाडसी लेक पुन्हा स्वयंपाक घरात धावली. सुरक्षित ठिकाणी घेतलेली ही धाव अगदी चार फुटांवर आलेल्या काळालाही मागे सरकायला लावणारी ठरली. घर कोसळल्याने फर्निचर, साहित्य, धान्य व प्रापंचिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून या घटनेने त्या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींनाही धीर दिला. घरात साचलेले गुडघाभर पाणी उपसून काढण्यात आले. रात्री शेजाऱ्यांनी त्या दोघींना जेवण पोच केले. अंथरूण- पांघरूण भिजल्याने आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून हालत नसल्याने कालची रात्र जागून काढल्याचे मायलेकीने "सकाळ'ला सांगितले.
काय सांगू बाबा, उभ्या जन्मात ज्ये पाह्यलं नव्हतं, ते काल बघितलं. आमचं काय खरं नव्हतं, पण नशिबानं दुघीबी वाचलुया. काळ आल्याला पण, येळ आली नव्हती म्हणत्यात ते काल कळलं
श्रीमती यशोदा माने.
नर्सच्या वडिलांनाही काेराेना; साखळी पुन्हा वाढू लागली
पोलिस शेतकऱ्यांना मारतात, भाजी विक्रेत्यांना मारतात, त्यांच्या पिशव्या भरतात...
कलेक्टर साहेब कितीदा काढायचा पास?
मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.