सातारा : शहरातील मुख्य सराफी पेठेत सुरक्षा रक्षकावर हल्ला करून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना शाहुपूरी पोलिसांनी आज चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्वजण शहर परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत.
शहरातील सराफी पेठे दोन दिवसापूर्वी हादरली होती.
तेथील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून चोरट्यांनी 28 हजार संशयीतांनी लंपास केले होते. या प्रकाराची गंभिर दखल घेत पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शाहुपूरी पोलिसांना गुन्ह्याचा तपास ताताडीने लावण्याच्या सुचना दिल्या होत्या.
हेही वाचा - खबरीच निघाला चोर ; नव्वद दुचाकी हस्तगत
त्यानुसार शाहुपूरी पोलिस कामाला लागले होते. या गुन्ह्यातील एका संशयीताची माहिती त्यांना आज सकाळी मिळाली. त्याच्याकडे चौकशी करून अन्य साथीदारांची नावेही मिळविण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले होते. रात्री उशीपर्यंत या गुन्ह्यातील तीघे पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती समजत होती. परंतु, अधिकृतरित्या पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
पार्ट्यांसाठी घरफोडया व चोऱ्या
सातारा : जिल्ह्यातील कोरेगाव कऱ्हाड, पाटण, खटाव या तालुक्यांमध्ये घरफोड्यांचा धुमाकुळ घालणाऱ्या कोरेगाव-खटाव तालुक्यातील पाच संशयीतांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. कामधंदा न करता दररोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पार्ट्या झोडण्याच्या सवयीमुळे संशयीत पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
अविनाश बाबासो चव्हाण (वय 29), अक्षय मारूती गायकवाड (वय 26, दोघे रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), विष्णू प्रकाश जठार (व 26, रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव), संतोष यशवंत घोरपडे (वय 28, रा. चोरगेवाडी, ता. कोरेगाव) व सुशांत दत्तू लोकरे (वय 38, रा. चोराडे, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांनी बारा घरफोडया व चोऱ्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून एक लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चोऱ्या व घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
कामधंदा न करता त्यांचे चांगले राहणीमान
दरम्यान काल रहिमतपूर परिसरामध्ये राहणारे पोलिसांच्या यादीवरील काही संशयीत हे गेल्या काही दिवसांपासून कुठलाही कामधंदा न करता, चांगले राहणीमान ठेवून दररोज चांगल्या हॉटेलमध्ये पार्ट्या झोडत असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी जऱ्हाड यांना संशयीतांना ताब्यात घेण्यास सांगितले. चोकशीमध्ये त्यांनी रहिमतपूर, बोरगाव, पाटण, औंध व उंब्रज परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळा, बंद दुकाने, पान टपऱ्या, हॉटेल्स, मोबाईल शॉपी मध्ये घरफोडया केल्याची कबूली दिली. अशा प्रकारचे रहिमतपूर, बोरगाव, उंब्रज, औंध, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये एकूण बारा घरफोडया केल्याची माहिती समोर आली.
एक लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
त्यांच्याकडून एक प्रोजेक्टर, एक स्कॅनर प्रिंटर, एक प्रिंटर, नऊ एलसीडी मॉनीटर, तीन सीपीयु, सहा किबोर्ड, तीन माऊस, दहा हजार रुपये रोख रक्कम व ड्रिप करीता वापरण्यात येणारी औषधे व बॅग असा एकूण एक लाख 49 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचा मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाही कामी रहिमतपूर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले. प्रविण फडतरे, राजू ननावरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नितीन भोसले, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहसिन मोमीन, संजय जाधव, विजय सावंत, पंकज बेसके यांनी ही कारवाई केली आहे.
वेगवेगळ्या गावांत केल्या घरफोडया
या संशयीतांनी पाटण, निसरे फाटा, उंब्रज, उरुल, औंध, चौकीचा आंबा, बोरगाव, निसराळे फाटा या गावांमध्ये रात्रीच्या घरफोडया केल्या आहेत. तरी, या भागातील नागरिकांनी गुन्ह्यांबाबत तक्रार केली नसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे वर्षा दीड वर्षापूर्वी साडेचार कोटींचा दरोडा पडला होता. कऱ्हाड व चिपळूण पोलिसांनी समन्वय ठेवत त्याचा तपास शिताफीने करुन अवघ्या चार तासांत आराेपींना जेरबंद केले हाेते. त्याविषयी...
भामट्यांचा "प्लॅन' पोलिसांना उद्ध्वस्त केला
गुन्हेगार कितीही चलाख, चपळ असला तरी त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली, समन्वय ठेवला, की तो पळून जाऊच शकत नाही. वर्षा दीड वर्षापूर्वी कऱ्हाडला साडेचार कोटींचा दरोडा पडला होता. कर्नाटकातील विजापूर येथील एका कारखान्याला साडेचार कोटींचे कर्ज देण्याचा बहाणा करून तीच रक्कम लुटण्याचा भामट्यांचा "प्लॅन' पोलिसांना उद्ध्वस्त केला होता. त्या गुन्ह्यात संशयितांना साडेचार कोटींच्या रोख रकमेसह कोकणातील संगमेश्वर पोलिसांनी केवळ चार तासांत रंगेहात पकडले. कऱ्हाड व चिपळूण पोलिसांच्या समन्वयामुळे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड झाले. त्या गुन्ह्याचा तपास आजही पश्चिम महाराष्ट्रात पोलिसांच्या समन्वयाच्या तपासात अव्वल ठरतो.
पोलिस खात्यात समन्वय असेल तर काय होऊ शकते, त्याचा अनुभव, प्रत्यंतर वर्षा- दीड वर्षापूर्वीच आले. कऱ्हाडच्या हायवेवरून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेचार कोटींची लूट झाली. कारखान्याच्या संचालक मंडळाला मारहाण करून त्यांना कर्ज स्वरूपात दिलेली रक्कमच "क्राईम बॅंच'चे पोलिस असल्याचा बनाव करून लुटली होती. त्यासाठी कारखान्याच्या एका संचालकाचेही अपहरण झाले होते. त्यामुळे पोलिस असल्याचा बनाव करणे, अपहरण, दरोडा अशा कलमांचा तो गुन्हा होता. त्या प्रकरणात पोलिसांनी गाडी कोणत्या दिशेला गेली, याचा अचूक अभ्यास करून कोकणातील चिपळूण व रत्नागिरी पोलिसांशी समन्वय ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.
कऱ्हाड व चिपळूण पोलिसांच्या समन्वयातून साडेचार कोटी रुपयांच्या लुटीचा छडा केवळ चार तासांत लावण्यात आला. त्या दरोड्याचा तपास पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा ठरला. कर्नाटकातील विजापूर येथील साखर कारखाना आर्थिक अडचणी होता. त्या कारखान्याला कर्ज देतो, असा बनाव करून त्या कारखान्याला दिलेली रोख रक्कम लुटण्याचा "प्लॅन' काही लोकांनी आखला होता. त्यासाठी ठाणे येथील फायनान्स कंपनी आहे, असेही दाखविण्यात आले होते. वास्तविक जी कंपनी होती, त्याच कंपनीच्या म्होरक्याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने "क्राईम ब्रॅंच'चे पोलिस असल्याचा बनाव करत कारखान्याच्या अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना लुटले होते. कर्जासाठी द्यायला आणलेली साडेचार कोटींची रक्कम लुटली.
हेही वाचा - कऱ्हाड : महाविद्यालयीन मुलींच्या गटात राडा
विजापूर येथील एका साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ वारणानगरच्या परिचयाच्या एका व्यक्तीस भेटण्यासाठी कऱ्हाड येथे आले. येथेच भेट होणार असल्याचे सांगून बोलवण्यात आले होते. त्यानुसार सारे लोक कऱ्हाडला भेटले. त्या वेळी वारणानगरच्या संबंधिताने कारखान्याच्या संचालकांना कर्ज देणाऱ्या "पार्टी'स भेटवतो, असे सांगितले. त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, त्यांच्यासोबत आलेल्या निवृत्त पोलिस उपअधीक्षकांची त्यांनी भेट घडवून आणली. ती भेट कऱ्हाडमधील हायवेवरील एका अलिशान हॉटेलमध्ये झाली. त्या वेळी तेथे बोलावलेल्या व्यक्तीने त्यांना साडेचार कोटींची रोख रक्कम दिली. ती त्यांच्या स्कार्पिओ गाडीमध्ये ठेवण्यात आली.
त्याचबरोबर त्या गाडीत कारखान्याचे अध्यक्ष, संचालकांसोबत बैठकीस आणणारे आणि बैठक घडविणारेही बसले. ती स्कर्पिओ गाडी हॉटेलपासून कऱ्हाडकडे निघाली होती. त्या वेळी गाडीत बैठक घडवून आणणाऱ्यांच्या साथीदारांनी स्कर्पिओला त्यांची गाडी आडवी मारली. ती गाडी अडवल्यानंतर त्यांनी आम्ही "क्राईम ब्रॅंच'चे पोलिस असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी स्कार्पिओमधील अध्यक्षांसह कार्यकारी संचालकांस मारहाण केली. त्यांना स्कॉर्पिओतून उतरवून इनोव्हा गाडीत बसवले, तर अन्य एकासही त्यांनी गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम गाडीत असल्याने त्याने उतरण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित स्कॉर्पिओ घेऊन गाडी आडवी मारणाऱ्यांनी तेथून वाहनासह पोबारा केला.
नक्की वाचा - सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे हे उत्तर
त्यांची गाडी रत्नागिरीकडे धावली. त्यांच्याबरोबर दुसरी कारही होती. त्यात अन्य दोघेही होते. त्यादरम्यान या प्रकाराची माहिती शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याची माहिती तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना दिली. त्यांनीही वरिष्ठांना माहिती देऊन तपास सुरू केला. मोठ्या रकमेचा दरोडा पडल्याने पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली होती. पलायन केलेले वाहन कोकणच्या मार्गावर होते. त्या वेळी पलायन केलेल्या वाहनातून अपहरण झालेला संचालकही होता. त्याने लघुशंकेसाठी त्यांचे वाहन जबरदस्तीने चिपळूणजवळ थांबवले. गाडीतून उतरताच तडक तो चिपळूण पोलिस ठाण्यात गेला.
तेथे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर चिपळूणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरून संबंधित गाडीचा पाठलाग केला. रत्नागिरीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांना याच प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ते सहकाऱ्यांशी समन्वय साधत होते. रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी असल्याने संगमेश्वरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक महेश थिटे यांनी ती स्कार्पिओ संगमेश्वर ते देवरुख रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास अडवली. त्या वाहनात चोघेही संशयित साडेचार कोटींच्या रोख रकमेसह पोलिसांच्या ताब्यात सापडले. या सगळ्या तपासात सातारा व रत्नागिरी पोलिसांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरला.
त्यात साताऱ्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील, तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, तत्कालीन शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, तसेच रत्नागिरीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मित्तेश घट्टे, पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी समन्वयातून काम केल्यानेच मोठा तपास मार्गी लागला होता.
घाटात बदलल्या नंबरप्लेट
पोलिसांच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड झाली. त्यामध्ये वारणानगरच्या व्यक्तीच्या माध्यमातून विजापूरच्या कारखान्यातील अध्यक्षांसह संचालकांना कर्ज देतो, असे सांगून कऱ्हाडमध्ये भेटण्यासाठी बोलावल्याची माहिती फायनान्स कंपनीच्या म्होरक्याला होती. त्यानेच संबंधित साथीदारांच्या मदतीने कट रचून लूट केली.
अवश्य वाचा - हे तीन दिवस वासोट्याच्या ट्रेकींगला बंदी
त्यामुळे कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीचा मालकच लुटीचा मास्टरमाईंड ठरला होता. त्याची एवढी मोठी लूट करण्याचे प्लॅनिंग तीन महिन्यांपासून सुरू होते. ज्या दिवशी लूट होणार होती. त्या सगळ्या लुटीचे प्लॅनिंग त्यांनी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आदल्या दिवशी केले होते. लुटीसाठी चार गाड्यांचा वापर केला होता. त्या गाड्यांच्या नंबरप्लेट त्यांनी चिपळूणच्या घाटात बदलल्या होत्या. पोलिसांनी पकडल्यानंतर नावेही त्यांनी बोगस सांगितली होती. पकडलेले सर्व संशयित बांद्रा, ठाणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.