सातारा : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये ग्रामीण भागातील स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात "मनरेगा'च्या कामांना परवानगी दिली आहे. सामाजिक अंतर पाळून ही कामे गावनिहाय सुरू होणार असून, ग्रामपंचायत विभागाने वैयक्तिक व सार्वजनिक अशी 1758 कामे मंजूर करून ठेवली आहेत. बंदच्या काळात गावातील गोरगरीब मजुरांना "मनरेगा'च्या कामांचा आधार मिळणार आहे. यातून मिळणाऱ्या हजेरीतून गोरगरीब मजूर किमान जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकणार आहेत.
कोरोनाच्या बंदमुळे शहरीसह ग्रामीण जनजीवनावर परिणाम झालेला आहे. हातावर पोट असलेल्यांना आता आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत किमान दिवसभराच्या कामातून दोन पैसे हातात पडणे आवश्यक झाले आहे. हे ओळखून शासनाने लॉकडाउनमधून "मनरेगा'च्या कामांना सूट दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने प्रत्येक गावात ही कामे सुरू करता यावीत, यासाठी आधीच तब्बल 1758 कामे मंजूर करून ठेवली आहेत. या कामांवर येणाऱ्या मजुरांना दिवसाकाठी 238 रुपये मजुरी मिळणार आहे. या मजुरीतून किमान जीवनावश्यक वस्तूतरी हे मजूर खरेदी करू शकणार आहेत. सध्याच्या काळात हातावर पोट असलेल्या मजुरांना दिवसभरामध्ये काम मिळणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे ही "मनरेगा'ची कामे आता गावनिहाय सुरू करण्याची तयारी ग्रामपंचायत विभागाने केली आहे. त्यानुसार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत मंजूर केलेल्या कामांपैकी काही कामे गावनिहाय सुरू करावीत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
"मनरेगा'च्या सध्या मंजूर केलेल्या वैयक्तिक कामांमध्ये सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, शेळीपालन शेड उभारणे, गांडूळ खत, शेततळे, शोष खड्डे, शौचालये, विहीर पुनर्भरणाचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक कामांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, स्मशानभूमी शेड, खेळाचे मैदान, वृक्षलागवड, पाणंद रस्ते या कामांचा समावेश केला आहे. या कामांवर मजूर काम करताना त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर ठेवणे, मास्क पुरविणे, सॅनिटायझर देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे.
मंजूर कामे व संख्या
सिंचन विहिरी 54, जनावरांचे गोठे व शेळीपालन शेड 203, गांडूळ खत 211, शेततळी तीन, शोष खड्डे 655, शौचालये 329, विहीर पुनर्भरण चार तसेच सार्वजनिक कामांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे पाच, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दोन, स्मशानभूमी शेड एक, खेळाचे मैदान दोन, वृक्षलागवड 234, पाणंद रस्ते 55.
ब्रेकिंग : अवघ्या काही तासांत कराडला तीन रुग्ण पाॅझिटिव्ह; साताराची संख्या 21 वर
Big Breaking : गृहराज्यमंत्र्याच्या हाेमपिचवर हाेमगार्डला मारहाण; पाेलिसांची धरपकड
हळदीचे दूध पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्या; दूध संघाचं राज्य सरकारला आवाहन
तालुकानिहाय मंजूर कामे
जावळी 90, कऱ्हाड 161, खंडाळा 107, खटाव 109, कोरेगाव 188, महाबळेश्वर 57, माण 419, पाटण 52, फलटण 184, सातारा 143, वाई 248 अशा एकूण 1758 कामांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकषांप्रमाणे सामाजिक अंतर पाळून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. जेणेकरून ग्रामीण भागातील गरजू मजुरांच्या हाताला काम मिळेल. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन मंजूर कामांतील कोणतेही काम आपापल्या गावाच्या परिसरात सुरू करावे.'
-अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, सातारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.