सिंधुदुर्ग, कऱ्हाडमध्ये विमानतळ झालं. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात होताहेत. मग सांगलीत ते परडवणारं नाही, अशी नकारघंटा लावली जाते.
सिंधुदुर्ग, कऱ्हाडमध्ये विमानतळ झालं. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात होताहेत. मग सांगलीत ते परडवणारं नाही, अशी नकारघंटा लावली जाते. त्यापेक्षा कवलापूरच्या जागेवर पाच गुंठ्यातले ‘महा’उद्योग आणायचे स्वप्न दाखविले जातेय. जिल्ह्याचे मुख्यालय सांगलीपासून ३० किलोमीटरवर मणेराजुरीला नियोजित ‘एमआयडीसी’च्या जागेवर विमानतळाचे गाजर दाखवून ‘डाव’ टाकला जातोय. काय आणि कसले हे कारस्थान आहे? जिल्ह्याच्या विकासाच्या मुळावर येणारे असले राजकारण सर्वांनाच खड्ड्यात घालणारे आहे. असंच करीत बसलो तर आपल्याला भावी पिढ्या माफ करणार नाहीत.
कवलापूरच्या १६० एकर जागेचा बाजार करण्याचं कारस्थान तसं जुनंच. अनेकांचा या जागेवर डोळा आहे. सांगलीलगत इतकी प्रशस्त जागा येनकेन प्रकारे घशात घालायचे कारस्थान अलीकडे नव्याने शिजतेय ते पाच-सहा वर्षांपासून. अगदी चोरीछुपे कोणाला तेथे चार-पाच गुंठ्याचे फॅब्रिकेशनचे दुकान टाकून जिल्ह्याची उद्योगनगरी करायचीय; तर कोणाला इथे स्पाईस पार्क करून मसाला विकून जागेचा ‘बाजार’ करायचा आहे. आता असे उद्योग करायला सगळा जिल्हा मोकळा असताना याच जागेवर का डोळा? जतपासून चांदोलीपर्यंत एमआयडीसी आहेत, जागा आहेत.
मग ते उद्योग करायला त्यांना का बरे सुचत नसेल? शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली-कागल एमआयडीसी हजार-दोन हजार एकरांच्या असताना सांगलीत १६० एकरात महाउद्योगनगरी उभी करण्याचे गाजर का बरे दाखविले जात असेल? काही मंडळी कोल्हापूरला ५० किलोमीटरवर विमानतळ असताना कवलापूरला कशाला? असा तिढा टाकत आहेत. त्याचवेळी ३० किलोमीटर अंतरावर विमानतळ उभे करण्याचे आश्वासन खासदार संजय पाटील दाखवत आहेत. मग एकदा सांगूनच टाका ना, की सांगलीला विमानतळाची गरजच नाही, उगीच लोकांच्या अपेक्षेचा फुटबॉल करू नका.
‘सकाळ’ने भूमिका घेत यावर कोणता आमदार गेल्या विधानसभा अधिवेशनात बोलतो, याची वाट पाहिली; पण सारेच मौनात. आता खासदार संजय पाटील आणि दस्तूरखुद्द पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मौन सोडले. कवलापूरला विमानतळाबाबत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर खासदारांनी उत्तर दिले. कवलापूरची जागा विमानतळासाठी कमी पडते म्हणून ते अन्यत्र म्हणजे स्वतःच्या तालुक्यात मणेराजुरीला करावे, असा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी त्यावर मान डोलवली. आम्ही या दोघांनाही समस्त सांगलीकरांतर्फे सांगू इच्छितो की, कवलापूर विमानतळाचे सांगलीकरांचे स्वप्न ५० वर्षांपासूनचे आहे. तेव्हाही जागा अपुरीच होती. त्यामुळेच धावपट्टीच्या विस्तारासाठी शेजारच्या जागेवर आरक्षण टाकले आहे.
महामार्गांसाठी जसे भूसंपादन होते, तसेच या जागेसाठी आणखी २०० एकर जागा लागली तरी त्याचे बाजारभावाने मूल्यांकन करून भूसंपादन करण्यासाठी खासदारांनी ताकद पणाला लावायला हवी. त्यासाठीच त्या जागेवर आरक्षण टाकले आहे. कवलापूरला काही आंतरराष्ट्रीय विमानतळ अपेक्षित नाही. देशांतर्गत विमानतळ अपेक्षित आहे. सिंधुदुर्गला नुकतेच झालेय. सांगली देशाच्या नकाशावर आली पाहिजे. ज्या कोल्हापूरच्या विमानतळाकडे बोट दाखविले जातेय, त्या विमानतळाचा विकास गेल्या २० वर्षांपासून होतोय, तेव्हा तिथे आता कुठे एखाद-दुसरे विमान रोज भरारी घेतेय.
नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यावर रोजगारासाठी घरेदारे सोडून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. याउलट आपले लोकप्रतिनिधी कोल्हापूरच्या विमानतळाकडे नजर लावून बसले आहेत.
कवलापूर विमानतळाचा फुटबॉल केला जातोय. सांगली-कवलापूरमधील अनेक जाणते नागरिक त्यासाठी आंदोलन करीत असताना हे जाणीवपूर्वक होतेय. दहा वर्षांपूर्वी रामलिंग डोंगरावर विमानतळाची कल्पना मांडली गेली. त्यातही बराच वेळ दवडला. पिढ्यांचं नुकसान झालं. पुणे, सातारा, बेळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद अशी शहरं भरारी घेत असताना आपल्याकडे पोटापाण्यासाठी गावं सोडावी लागत आहेत. इथं उद्योग यावेत, यासाठी जे पडेल ते प्रयत्न केले पाहिजेत. त्यातला पहिला प्रयत्न विमानतळाचा असेल.
सांगलीपासून दूर कुठेतरी विमानतळाचं गाजर दाखवून आपण काय साध्य करणार आहोत? खुद्द खासदारच अशी भूमिका घेत असतील तर गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला डावलून सांगलीकरांनी याचसाठी त्यांची निवड केली का? ते लोकभावना बाजूला ठेवून विकासाचा फुटबॉल करीत आहेत. ते त्यांना आणि जिल्ह्याला परवडणारे नाही. खरे तर त्यांनी सारी ताकद त्यांच्या परिचयाच्या ज्योतिरादित्य शिंदेंसारख्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करायला लावायली हवी. लोकसभेतही आवाज उठवायला हवा. हक्काचा खासदार म्हणून त्यांच्यावर सांगलीकरांचा तो अधिकारच आहे. त्यासाठी सांगलीचे श्री गणराय त्यांना विवेकबुद्धी देवोत.
गेल्या विधानसभा अधिवेशनात सांगलीचे दूरदृष्टीचे नेते जयंत पाटील यांचं निलंबन झालं, याबद्दल सांगलीकरांना खूप वाईट वाटलं; पण असं निलंबन सांगलीच्या प्रश्नांवर झालं असतं तर सांगलीकरांना अत्यानंद झाला असता.
राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी सांगली म्हणजे फोंडा माळ होता. त्या माळावर कमल फुलले. चार-चार आमदार झाले. सुधीर गाडगीळ यांना सांगलीकरांनी दोन वेळा आमदार केलेय. त्यांनीही आता या विषयावर मौन सोडले पाहिजे. विश्वजित कदम यांच्यापासून जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत. येणारा काळ या सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे. आम्ही लक्ष ठेवून आहोत, विमानतळाच्या बाजूने कोण आहेत?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.