सोलापूर : मिळकत व पाण्याच्या कराची लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर झळकू लागली आहेत. सिद्धेश्वर आणि बेगम पेठेत फलक लावून महापालिकेने या मोहिमेची सुरवात केली आहे.
मिळकत व पाण्याच्या कराची लाखो रुपये थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ती संबंधित गल्लोगल्ली लावण्यात येणार आहेत. या संदर्भातील आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ऑगस्टमध्ये दिले होते. मात्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, मोहरम, दिवाळी यामुळे त्याची कार्यवाही झाली नव्हती. दिवाळी संपल्यानंतर पालिकेने आता डिजिटल फलक लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
शहराच्या काही ठराविक पेठा आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरातील बहुतांश मिळकतदार थकबाकी भरण्यास सहसा तयार होत नाहीत. अनेकदा कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. गावठाण भागातील मिळकतदार पैसे भरण्यास तयार असतात, मात्र बहुतांश मिळकतदारांकडून नगरसेवकांमार्फत दबाव आणला जातो. त्यामुळे लाख रुपये थकबाकी असली, तरी पाच किंवा 10 हजार रुपयांवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागते. या मोहिमेमुळे थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लखपती थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करून ते प्रभागनिहाय गल्लोगल्ली लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही केली जात आहे. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागांत ते लावले जातील.
- आर. पी. गायकवाड, करसंकलन प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.