सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदही आपल्याकडे सहजासहजी येईल, असा फाजील आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी बाळगला होता. तो फाजील आत्मविश्वासच त्यांना नडल्याचे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. जिल्ह्यातील भाजप-समविचारी आघाडीतील नेत्यांची साथ सोडून देत महाविकास आघाडीशी घरोबा केलेल्या आमदार संजय शिंदे यांच्याशिवायही जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवू शकतो, हे भाजप-समविचारी आघाडीने जिल्ह्याला दाखवून दिले.
हेही वाचा : अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषद परिसरात जल्लोष
आमदार संजय शिंदे यांच्याशिवायही करून दाखविले
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीमध्ये राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांनी लक्ष घातले होते. काहीही झाले तरी सत्ता आपलीच यायला हवी. त्यासाठी दोन पाऊल मागे घेण्याच्या सूचनाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपने दोन पाऊल मागे घेत समविचारी नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे निवडीची प्रक्रिया स्थानिक नेत्यांनी राबविली. माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, भीमा परिवाराचे नेते विजयराज डोंगरे यांनी योग्यप्रकारे नियोजन करून आमदार संजय शिंदे यांच्याशिवायही जिल्हा परिषदेत सत्ता मिळविली आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून भाजप व समविचारीसोबत असलेल्या शिंदे यांनी आमची साथ सोडायला नको होती, अशी भावना एका आमदाराने व्यक्त केली. आमदार शिंदे सोबत असते तर आणखी मोठा विजय मिळविता आला असता, असेही त्यांनी सांगितले.
"महाविकास'कडून अयशस्वी प्रयत्न
महाविकास आघाडीकडून आमच्याकडेच बहुमत असल्याचा दावा केला जात होता. 37 ते 39 सदस्य आमच्यासोबत असल्याचे त्यांचे नेते सांगत होते. मात्र, त्यांचा दावा निवडीच्यावेळी फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. ज्याप्रमाणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडीमध्ये लक्ष घातले होते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही (उपमुख्यमंत्री अजित पवार) यात लक्ष घातले होते. मात्र, तरीही सत्ता मिळविण्यात त्यांना यश आले नाही. केवळ पोकळ गप्पा मारण्यात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मश्गूल असल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीच्या सदस्यांना सहलीवर नेऊनही त्याचा सत्तेच्या समीकरणात काहीच उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे मन वळविण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपयश आले. सुरवातीच्या काळात त्यांच्याकडे असलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे आवताडे त्यांच्यापासून दुरावले गेले. शेवटी आवताडे यांनी भाजप-समविचारी आघाडीला शब्द दिल्याने निवडीचे चित्र पालटले. वेळ निघून गेल्यावर "महाविकास'कडून आवताडे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. पण, तो अयशस्वी ठरला.
भाजपच्या माध्यमातून मोहिते-पाटलांना संधी
राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असूनही अडीच वर्षांपूर्वी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र, मागील काही महिन्यांत त्यांनी पुन्हा "कमबॅक' करत जिल्हा परिषदेत आपल्या विचाराची सत्ता भाजपच्या माध्यमातून मिळविली आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार "फिल्डिंग' लावली होती. त्यांच्या विचाराची सत्ता जिल्हा परिषदेत आल्यामुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा अकलूजकरांना ताठ मानेने मिरविणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.