Solapur News : छत्रपती संभाजी चौक (जुना पूना नाका) ते पत्रकार भवन (विजयपूर रोड) या साडेपाच किमीच्या पहिल्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी ९० कोटी लागणार आहेत. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीराजे पुतळा ते रेल्वे स्थानकापर्यंतचे निवाडे पूर्ण झाले आहेत.
पण, काही मालमत्तांची मालकी स्पष्ट झाली नसून काही इमारती वाचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेने भूसंपादन विभागाकडे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे उड्डाणपूल भूसंपादनाच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत.
शहरातील वाहतूक कोंडी व जड वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून २०१६ मध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर केले. पण, सहा वर्षांनंतर आता भूसंपादनाची कार्यवाही सुरु झाली आहे.
त्यासाठी महापालिका २७ कोटींचे कर्ज घेणार असून ते मंजूरही झाले आहे. आतापर्यंत तीन टप्प्याचे ॲवॉर्ड जाहीर झाले असून रेल्वे स्टेशन ते सात रस्ता या चौथ्या टप्प्यातील ॲवॉर्ड मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून तेथून कंबर तलावापर्यंतचे ॲवॉर्ड देखील लवकरच जाहीर होणार आहेत.
पण, पहिल्या टप्प्यातील १४ मालमत्ताधारकांनी ज्यादा मोबदल्यासाठी दावे दाखल केले आहेत. दरम्यान, काडादी चाळीचाही प्रश्न सुटला नसून रहिवासी संघाने ‘अगोदर आमचे पुनर्वसन करा, मगच जागेचा ताबा घ्या’ अशी मागणी केली आहे.
विशेषत: यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होऊनही महापालिकेने त्यांच्या पुनर्वसनावर काहीच कार्यवाही केलेली नाही.
दुसरीकडे संभाजी शाळेजवळील (गट नं. १२५\२) जागेवर सिद्धेश्वर पंच कमिटी, राज्यपाल, महापालिका, जुनी मिल बेकार कामगार, महावितरण अशी अनेकांची नावे असल्याने ती जागा शासनाची की खासगी हे अस्पष्ट असल्याने त्या जागेचा मूळ मालक कोण, अशी विचारणा भूसंपादन कार्यालयाने नगर भूमापन अधिकाऱ्यांकडे केली आहे. पापय्या तालिमीचाही तसाच प्रश्न आहे.
भूसंपादनापूर्वीच ‘या’ मालमत्तेचा तिढा
पहिल्या उड्डाणपूलाच्या भूसंपादनाचे काम ५० टक्क्यांपर्यंत संपले आहे. पण, पहिल्या टप्प्यातील छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील एसटी स्टॅण्डच्या जागेचा तिढा सुटला नाही.
नसून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक-सुपर मार्केट ते रेल्वे स्टेशन या मार्गावरील वैष्णवी बिल्डिंग, नवीवेस पोलिस चौकीजवळील बजाज शोरूमची जागा व नाथ प्लाझा, काडादी चाळ पूर्णपणे बाधित होऊ न देता लागेल तेवढीच जागा संपादित करण्यासंदर्भात महापालिका आग्रही असून त्या जागांची पुन्हा मोजणी केली जात आहे.
दरम्यान, या मार्गावरील शासकीय जागा महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार आहे. पण, त्यावर अजूनपर्यंत काहीच ठोस निर्णय झालेला नाही.
छत्रपतींचा पुतळा जागेवरच राहणार
उड्डाणपूलामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर स्मारक समिती तयार झाली आणि त्यांनी पुतळ्यासंदर्भात महापालिकेकडे भूमिका स्पष्ट केली. आता पुतळा आहे तेथेच ठेवला जाणार असून उड्डाणपूल एका बाजूने नेला जाणार आहे.
तशी मागणी स्मारक समितीने महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे आता पुन्हा तेथील परिसरातील मोजणी करावी लागणार असून हरकती मागवून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, तरीपण ३१ मार्चपर्यंत पहिल्या उड्डाणपूलाच्या भूसंपादनाची कार्यवाही संपविण्याचे नियोजन असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.