सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक कधी होईल? हे कोणालाही ठाम माहिती नाही. जिल्ह्याच्या राजकारणाला ताकद देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या डीसीसीवर येण्यासाठी आता सर्वच नेत्यांनी सुप्तपणे डाव टाकण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आमदारकी काढून घेतल्यानंतर आता त्यांच्या हातात असलेला सहकारही काबीज करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. भाजप आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यात २१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची स्थापना करून डीसीसीमध्ये येण्याची वाट शोधली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सहकारावर आजही बबनराव आवताडे यांचेच वर्चस्व आहे. या तालुक्यात असलेल्या ७९ सोसायट्यांपैकी ६० हून अधिक सोसायट्यांवर बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. या तालुक्यातील सहकारात शिरकाव करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी नवीन सोसायट्या स्थापन करण्याचा मार्ग निवडला आहे. सत्तेच्या माध्यमातून सहकारात शिरकाव करण्यासाठी आमदार आवताडे यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
एका सोसायटीसाठी जवळपास सहा लाख रुपयांचा खर्च असे एकूण सव्वाकोटी रुपये खर्च करून आमदार आवताडे यांनी मंगळवेढ्याच्या व सोलापूरच्या सहकारात दमदार एन्ट्री केल्याचे दिसते. मंगळवेढा तालुक्यातील यड्राव, हिवरगाव, माचणूर, रहाटेवाडी, येळगी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, मानेवाडी, रेवेवाडी, नंदेश्वर, मारापूर, मुंडेवाडी, भोसे, बोराळे, शिरसी, डोणज, बावची, तळसंगी, कात्राळ या गावांसह मंगळवेढा शहर परिसरात दोन नव्या सोसायट्या सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी जवळपास एक ते दीड वर्षांपासून राज्य सरकारकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या सोसायट्यांच्या माध्यमातून आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
या सोसायट्यांमुळे आगामी काळात जिल्हा बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, संत दामाजी सहकारी साखर कारखाना या संस्थांच्या निवडणुकीत मदत होणार आहे. त्यापेक्षाही सर्वात मोठा लाभ या गावातील २१ गावातील जे शेतकरी कर्जपुरवठ्यांपासून वंचित राहिले होते, त्यांना कर्जपुरवठा, सहकार विभागाच्या योजना मिळण्यास मोठा लाभ होणार आहे. सहकारापासून सुटलेला मोठा वर्ग या निमित्ताने सहकारासोबत जोडला जाईल.
- समाधान आवताडे, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.