मोहोळ : मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्याच्या 15 जून या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत 3 हजार 28 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपल्या आयुष्याच्या शिक्षणाचा "श्री गणेशा" केला. दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने मराठी शाळेत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन "गावातीलच शाळा सरस" असल्याचा विश्वास अधोरेखित केला.
या संदर्भात माहिती अशी की, सध्या शहरीसह ग्रामीण भागातील पालकांच्या डोक्यात आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचे "फॅड" वाढले आहे. त्यामुळे मागील काही वर्षापूर्वीचा गावातील जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास कमी झाला होता. मात्र ज्या पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेत घातली त्यांचा वार्षिक रिझल्ट व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक रिझल्ट या दोन्हीची तुलना केली तर यात तफावत आढळून आली. त्यामुळे पालकांचा कल पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वाढला.
दरम्यान ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. त्यामुळे अधिकारी वर्ग कामाला लागला. जिल्हा परिषदेने वैयक्तिक ही लक्ष दिले. दरम्यान ग्रामीण भागातील शाळातील पट वाढ होण्यासाठी "गुढीपाडवा पट वाढवा" ही मोहीम शिक्षण विभागाने राबविल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाला. कोविड काळात शिक्षकांनी शिक्षणात खंड पडून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण दिले, हेच कारण विश्वासाला पात्र ठरले.
चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने तीन "टी" वर लक्ष केंद्रित केले आहे. पहिला टी म्हणजे टीचर गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडणे व अध्यापन करणे, दुसरा टी म्हणजे टेक्नॉलॉजी शिक्षण क्षेत्रात ही नवनवीन तंत्रज्ञान अवगत झाले आहे त्यात स्क्रीनवरील शिक्षण, मोबाईल द्वारे शिक्षण, तसेच विविध शैक्षणिक ॲप द्वारे शिक्षण व ऑनलाईन शिक्षणाचा समावेश आहे. तिसरा टी म्हणजे ट्रेनिंग मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना उत्तम प्रशिक्षण देणे जेणेकरून त्यांच्या हातून चांगले विद्यार्थी घडावेत.
शासनाने शैक्षणिक धोरणात मात्र भाषेला मोठे प्राधान्य दिले आहे. त्याचाही परिणाम झाला आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ही आता अपडेट झाले आहेत. त्यामुळे गुणवत्ता वाढीस वाव आहे.
- अविचल महाडिक, गटशिक्षणाधिकारी मोहोळ
दृष्टिक्षेपात मोहोळ तालुका
एकूण जिल्हा परिषदेच्या शाळा- 245
एकूण पटसंख्या- 20 हजार 31
पहिल्या दिवशीची उपस्थिती- 15 हजार 858
पहिल्या दिवशीचे प्रवेश- 3 हजार 28
प्रत्यक्षात उपस्थिती- 2 हजार 617
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.