हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून लांब अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे.
सोलापूर : राज्य सरकारमध्ये (State Government) विलिनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असताना, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (Maharashtra State Transport Corporation) कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. शनिवारी अचानक संपावरील (ST Strike) कर्मचाऱ्यांच्या बदलीचे (Transfer) आदेश काढण्यात आले अन् सोलापूर विभागातील जवळपास 51 कर्मचाऱ्यांना आदेश देऊन लगेच कामावर हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून लांब अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय 275 जणांना निलंबित करण्यात आले आहे. 28 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा आज मंगळवारी 34 वा दिवस. या काळात मंडळाने केलेल्या विविध प्रयत्नांनंतरही संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. आतापर्यंत सोलापूर विभागातील 275 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर 28 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर या कारवाईचा कुठलाही फरक होत नसल्याचे पाहून महामंडळाने शनिवारी (ता. 4) अचानक कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढले आहेत. सोलापूर विभागातील 20 चालक, 19 वाहक व क्लर्क, मेकॅनिक, तसेच बॉडी फिटर या कर्मचाऱ्यांची बदली केली आहे.
शुक्रवारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विभाग नियंत्रकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले आहे. सोलापूर विभागातील नऊ आगारातील तर विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांची बदली विभाग नियंत्रकांच्या आदेशाने करण्यात आली आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हा कालावधी नाही. साधारणः विनंती बदल्या या काळात केल्या जातात. मार्च किंवा जूनमध्ये सर्वत्र बदल्या होतात. शनिवारचे बदली आदेश हे कर्मचारी कामावर यावेत या दृष्टीनेच काढले असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे, खासगी मालकीच्या असलेल्या शिवशाही बस सुसाट धावत आहेत. सोलापूर आगारात एकूण 10 तर बार्शी आगारात एकूण 7 शिवशाही गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सोलापूर-पुणे, बार्शी-पुणे या मार्गावर सध्या शिवाशाहीच्या फेऱ्या सुरू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोलापूर विभागातून सोमवारी एकूण 40 गाड्या सोडण्यात आल्या. विभागातील सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, कुर्डुवाडी या आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सोमवारी सोलापूर आगारातून शिवशाहीच्या आठ आणि बार्शी आगारातून तीन बस पुण्याकडे रवाना झाल्या. तर साध्या परिवर्तित असलेल्या एसटीच्या 29 बसच्या फेऱ्या या सोलापूर- तुळजापूर, सोलापूर- पंढरपूर, सोलापूर- बार्शी, मंगळवेढा- पंढरपूर, सांगोला- जत, सांगोला- सोलापूर, सांगोला- आटपाडी, सांगोला- हंगरगी, कुर्डुवाडी- वैराग, सोलापूर- कुर्डुवाडी, कुर्डुवाडी- टेंभुर्णी या मार्गांवर धावत आहेत.
आकडे बोलतात...
एकूण कर्मचारी : 3 हजार 900
कामावर हजर कर्मचारी : 450
निलंबित कर्मचारी : 275
सेवासमाप्ती : 28
संपात सहभागी कर्मचारी : 3 हजार 408
कर्मचाऱ्यांच्या बदल्या : 51
सोलापूर विभागातील आतापर्यंत 51 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांची सोय व्हावी यासाठी सोलापूर, बार्शी येथून पुण्यासाठी शिवशाहीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. हळूहळू यामध्ये वाढ करण्यात येईल.
- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.