पदरात एमए, बीएडची पदवी असताना शेतीतही वेगळी वाट चोखंदळत झिरो बजेट सेंद्रिय शेतीचा प्रयोग सतीश देशमुख यांनी यशस्वी करून दाखविला आहे.
करकंब (सोलापूर) : करकंब (ता. पंढरपूर) (Pandharpur)) येथील उच्चशिक्षित सतीश देशमुख (Satish Deshmukh) यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये तब्बल अकरा प्रकारच्या भाजीपाल्यांची (Vegetables) आंतरपिके घेऊन त्यांचे व्यवस्थापन शंभर टक्के सेंद्रिय (Organic farming) पद्धतीने केले आहे. त्यामुळे त्यांना या झिरो बजेट शेतीतून (Zero budget farming) चार महिन्यांत तीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. पदरात एमए, बीएडची पदवी असताना शेतीतही वेगळी वाट चोखंदळत झिरो बजेट सेंद्रिय शेतीचा प्रयोग सतीश देशमुख यांनी यशस्वी करून दाखविला आहे.
दहा प्रकारच्या भाज्यांची आंतरपीक पद्धतीने लागवड
सतीश देशमुख यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग काढल्यानंतर तारेचे कंपाउंड तसेच ठेवले आहे. याच क्षेत्रात त्यांनी टोमॅटो, वांगी, मिरची, पत्ताकोबी, ढोबळी मिरची, भेंडी, कारले, दोडका, दुधी भोपळा, घेवडा, गोसावळे आदी फळभाज्यांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, द्राक्ष बागेमधील तारेच्या कंपांउंडसाठी उभ्या केलेल्या लोखंडी अँगलच्या ठिकाणी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करून ते वेल तारेवर चढवले आहेत. इतर पिकांची लागवड त्यांनी भोदावर केली असून प्रत्येकी दोन ओळीत एका फळभाजीची लागवड केली आहे. सध्या या सर्व फळभाज्यांचा हंगाम चालू असून स्थानिक व्यापारी जागेवर येऊन भाज्या घेऊन जातात. त्यातून त्यांना दररोज अडीच हजाराहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळते. मागील दोन महिन्यांपासून हंगाम चालू असून अजून दोन महिने हंगाम चालेल, अशी आशा सतीश यांना आहे. त्यामुळे चार महिन्यात तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळू शकते.
देशी गायींचे जतन आणि झिरो बजेट सेंद्रिय शेती
सतीश देशमुख यांनी लहान-मोठ्या मिळून एकोणीस देशी गायी आणि चार म्हशी पाळलेल्या आहेत. निवाऱ्याच्या पत्राशेडला लागूनच त्यांनी प्लास्टिक कागद अंथरुन गांडूळ खताचे बेड तयार केले आहेत. पत्राशेडमधील दररोजचे शेण अगदी सहजपणे खोऱ्याने या बेडवर जमा केले जाते. बेडची साठवण क्षमता संपली की जनावरांचा मुक्काम दुसऱ्या पत्राशेडमध्ये हलविला जातो. अशा पद्धतीने ते जागच्या जागी गांडूळ खत तयार करतात. गांडूळ खताशिवाय जमिनीतील पोषकद्रव्ये वाढविण्यासाठी सतीश देशमुख शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसनपीठ यापासून तयार केलेल्या स्लरीचा वापर तीन दिवसांतून एकदा करतात. याशिवाय या गांडूळ खत निर्मितीवेळी तयार झालेले "व्हर्मी वॉश'ही (द्रावण) ते ठिबक सिंचनमधून पिकांना सोडतात व गरजेच्या वेळी फवारणीसाठीही वापरतात.
कीटकनाशकांचीही सेंद्रिय निर्मिती
टोमॅटो, वांगी, कोबी, भेंडी आदी पिकांवरील अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही सतीश देशमुख यांनी घरच्या घरीच सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करतात. त्यासाठी पंचवीस किलो कडुनिंबाचा पाला व कोवळ्या फांद्या, दोन किलो गुळवेल आणि पाच लिटर गोमूत्र पंचवीस लिटर पाण्यात उकळून घेतले जाते. हे द्रावण निम्मे म्हणजे बारा ते तेरा लिटर होईपर्यंत उकळले जाते. नंतर त्याचीच कीटकनाशक म्हणून फवारणी केली असता अळी व कीटकांचा प्रादुर्भाव रोखता येतो, हा त्यांचा अनुभव आहे. याशिवाय चिकट सापळ्यांचा वापर करून त्यांनी थ्रीप्सचा प्रादुर्भाव रोखला आहे. डंख मारणाऱ्या माशीसाठी जागोजागी ट्रॅप व ओटा ट्रॅप लावले आहेत.
गांडूळ खत व दूध-तुपातूनही उत्पन्न
तेवीस जनावरांच्या मल-मूत्रापासून तयार केलेले गांडूळ खत दीड एकर शेतीसाठी वापरून भरपूर प्रमाणात शिल्लक राहत असल्याने त्याची विक्रीही करतात. त्यासाठी त्यांनी स्वतःचा ब्रॅंड तयार केला आहे. एक किलो, दोन किलो, पाच किलो व दहा किलोचे पॅकिंग करून ते प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते. याशिवाय देशी गायीच्या दुधाबरोबरच देशी गायीच्या तुपालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे, तूप दोन ते अडीच हजार रुपये दराने गरजू लोक घरी येऊन नेतात.
आपल्याकडे बहुतांश शेतकऱ्यांकडे पाळीव प्राणी असल्याने सर्वांना गांडूळ खत प्रकल्प सहजासहजी करता येतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या असणाऱ्या सेंद्रिय शेतीकडे सर्व शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून "झिरो बजेट' शेती करता येते आणि उत्पादनही उत्तम प्रतीचे घेता येते, हे लक्षात आले आहे.
- सतीश देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.