पंढरपूर : अवघीच तीर्थे घडली एकवेळा ।
अवघीच पापे गेली दिगंतरी। वैकुंठ पंढरी देखिलीया ।।
अवघीया संता एकवेळा भेटी। पुंडलिक दृष्टी देखिलीया।।
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक । विठ्ठलची एक देखिलीया ।
तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणेच आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागा नदी स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनाने तृप्त झालेल्या लाखो भाविकांना जीवन सार्थक झाल्याची भावना मनी प्रकटली होती. दरम्यान बुधवारी (ता.१७) आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सुमारे पंधरा लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा पंढरीमध्ये एकवटला होता. चंद्रभागा नदी स्नानानंतर नगरप्रदक्षिणेला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज बारा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर
आषाढी एकादशी दिवशी पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. लाखो भाविकांनी एकादशीच्या पवित्र स्नानाची पर्वणी साधली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, संत सोपानकाका, संत एकनाथ महाराज, मुक्ताबाई आदी संतांच्या पादुकाना चंद्रभागेच्या पवित्र जलाने स्नान घातल्यानंतर पादुका रथांत ठेवून पालखी सोहळे प्रदक्षिणा मार्गावर नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाले होते. "ज्ञानोबा माऊली तुकाराम" जयघोषात व अभंग व टाळ, मृदुंगाच्या गजरात दिंड्यानी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली होती.
दरम्यान आज सकाळी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले काशिनाथ गंगाधर हातनुरे (रा.राजापूर,ता.धर्माबाद जि.नांदेड)' सकाळ'शी बोलताना म्हणाले, मंगळवारी (ता.१६) सकाळीं नऊ वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो होतो. तब्बल तेवीस तासानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. आम्ही सर्वजण शेकडो किलोमीटर दिंडी सोबत चालत आषाढी यात्रेला आलो होतो. मात्र एकादशी दिवशी त्यातही विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या बुधवारी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर डोळ्यातून आपसूक आनंदाचे अश्रू आले व सारा शिणवटा निघून गेला.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आषाढी यात्रेला आलेल्या लाखो वारकऱ्यांना मोफत बाटलीबंद पिण्याचे पाणी, मँगो सरबत यांचे वाटप तसेच शहरात दोन ठिकाणी मोफत अन्नदान करण्यात आले. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या मदतीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
आषाढी एकादशी दिवशी होणारी भाविकांची अलोट गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार, चौफाळा आदी महत्त्वाच्या ठिकाणी रस्सी पॉईंट तयार केले होते. महाद्वार परिसरामध्ये चारही दिशांनी भाविक येत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. हे पाहून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तेथे समक्ष उभा राहून पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य केले.
विठ्ठल, राही, रखुमाईची रथातून मिरवणूक
दरवर्षीप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची रथयात्रा निघाली होती. प्रदक्षिणामार्गावरील माहेश्वरी धर्मशाळेत विठ्ठल, राही व रखुमाईंच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. विठ्ठल, राही आणि रखुमाईंच्या मूर्ती रंगीबेरंगी फुलांनी आकर्षकपणे सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आल्या नंतर रथयात्रेला सुरुवात झाली. श्री विठ्ठलाच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशी क्षणचित्रे
आषाढी एकादशी सोहळ्यामध्ये पंधरा लाखाहून अधिक भाविक सहभागी, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी २२ ते २३ तास, मानाच्या पालख्यांची नगर प्रदक्षिणा, आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची रथयात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाचे लोकार्पण,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.